भागवत यांच्या कार्यक्रमास विरोध

Contributed byन्यूयॉर्क|महाराष्ट्र टाइम्स.कॉम
भागवत यांच्या कार्यक्रमास विरोध
अमेरिकेतील मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये होणाऱ्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत भारतीय समुदायाला संबोधित करत असलेल्या नियोजित कार्यक्रमाला माझा पाठिंबा नाही, अशी भूमिका न्यूयॉर्क शहराचे महापौर झोरान मामदानी यांनी म्हटले. मात्र, हा कार्यक्रम खासगी स्वरूपाचा असल्याने तो रद्द करण्याचा अधिकार शहराच्या प्रशासनाकडे नसेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेत मंगळवारी दाखल झालेले भागवत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित जागतिक संपर्क मोहिमेचा भाग म्हणून दौरा करत आहेत. यात कॅनडा आणि ब्रिटनचाही समावेश आहे. अमेरिकेत, शनिवारी (दि. २९) मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे पाच हजार जणांच्या मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत. या नियोजित कार्यक्रमावर अनेक नागरी हक्क संघटनांनी टीका केली आहे. ‘मी या कार्यक्रमाचे समर्थन करत नाही; परंतु खासगी कार्यक्रम रद्द करण्याचा शहराला काही अधिकार आहे की नाही, हे मला माहित नाही’, असे ते म्हणाले.
न्यूयॉर्क शहराच्या इतिहासातील पहिले भारतीय-अमेरिकन महापौर म्हणून मामदानी यांची ओळख आहे. त्यांच्या आईचे कुटुंब भारतातच राहते. ‘माझ्या कुटुंबाकडून भारताची जी संकल्पना शिकायला मिळाली आणि ज्या वातावरणात मी मोठा झालो, ती संकल्पना म्हणजे विविधतेने नटलेला समाज आणि धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक अशी होती; जिथे भारतातील प्रत्येक व्यक्तीला आपलेपणाची भावना अनुभवता येते’, असे ते म्हणाले. ‘वगळण्याच्या वृत्तीवर किंवा भेदभावावर आधारित विचारसरणीच्या चळवळीचा उदय पाहणे अत्यंत चिंताजनक आहे’, असे त्यांनी म्हटले.

भागवत यांच्या अमेरिका दौऱ्याबाबत ‘इंडियन ओव्हरसीज काँग्रेस’ने चिंता व्यक्त केली आहे. ‘अमेरिकेच्या जनतेसमोर स्वतःला जागतिक एकात्मता आणि संस्कृतींमधील संवाद यांचा पुरस्कार करणारी एक सांस्कृतिक संस्था म्हणून संघाला सादर करण्याचा प्रयत्न आहे’, असा आरोप करत या संघटनेच्या प्रयत्नांवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.