तृणमूलच्या बंडखोर खासदारांना नोटीस

Contributed byनवी दिल्ली|महाराष्ट्र टाइम्स
rebels of trinamool congress served notice action from supreme court
तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी पक्षांतरबंदी कायद्यानुसार पक्षाच्या वीस बंडखोर खासदारांविरुद्ध केलेल्या याचिकेची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतल्यानंतर लोकसभा सचिवालयाने संबंधित खासदारांना नोटिसा बजावल्या आहेत. या खासदारांना सात दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती सचिवालयाच्या सूत्रांनी बुधवारी दिली.

या नोटिसांसोबत अभिषेक बॅनर्जी यांनी १८ जून रोजी दाखल केलेल्या याचिकेची प्रतही जोडण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने बॅनर्जी यांची याचिका सुनावणीस घेण्यास संमती दर्शवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही कारवाई करण्यात आली. न्यायालयाने मंगळवारी २० बंडखोर खासदारांना नोटीस बजावली; मात्र लोकसभा अध्यक्षांचे कार्यालय किंवा लोकसभा महासचिव यांना औपचारिक नोटीस बजावली नाही.
बॅनर्जी यांनी यापूर्वी या खासदारांविरुद्ध स्वतंत्र अपात्रता याचिका दाखल केल्या होत्या. या प्रकरणांवरील कार्यवाही जलदगतीने पूर्ण करावी, अशी त्यांची मागणी आहे. याच संदर्भात त्यांनी अलीकडेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली होती. त्यापूर्वी २७ जुलै रोजी त्यांनी अध्यक्षांना स्मरणपत्रही पाठवले होते.