Anshuman Zhungaran Shines With Unique Success In Ocean Seven Mission As He Sets Guinness World Record
अंशुमन झिंगरानची विश्वविक्रमी झेप
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
नवी मुंबईच्या जलतरण क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरणारी कामगिरी भारतीय ओपन-वॉटर जलतरणपटू अंशुमन झिंगरान याने केली आहे. वयाच्या अवघ्या २१ वर्षे १०९ दिवसांत ‘ ओशन सेव्हन ’ ही जगातील अत्यंत खडतर सात ओपन-वॉटर जलमार्ग पार करण्याची मोहीम पूर्ण केल्याबद्दल गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ने त्याची ‘यंगेस्ट पर्सन टू कम्प्लिट द ओशन्स सेव्हन (मेल)’ म्हणून अधिकृत नोंद केली आहे. अंशुमनचा हा दुसरा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे.
३० जून २०२६ रोजी जपानमधील त्सुगारू सामुद्रधुनी पार करून अंशुमनने ‘ओशन सेव्हन’ मोहिमेतील सातवे आणि अंतिम आव्हान पूर्ण केले. त्याने हे अंतर ११ तास ३७ मिनिटे ४१ सेकंदांत पार केले. या ऐतिहासिक कामगिरीनंतर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने त्याच्या विक्रमावर शिक्कामोर्तब केले. अंशुमनच्या या यशामागे वाशी येथील फादर एग्नेल स्पोर्ट्स सेंटरमधील प्रशिक्षणाचा मोठा वाटा आहे. प्रशिक्षक गोकुळ कामत यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने सातत्याने सराव केला. अंशुमनने जुलै २०२३मध्ये वयाच्या १८ वर्षे १२६ दिवसांत उत्तर आयर्लंड ते स्कॉटलंडदरम्यानचा खडतर नॉर्थ चॅनल पोहून पार केला होता. तब्बल ११ तास २८ मिनिटे ५२ सेकंदांत ही मोहीम पूर्ण करून त्याने ‘यंगेस्ट मेल टू स्विम द नॉर्थ चॅनल’ हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. या पहिल्या विश्वविक्रमाने त्याला ‘ओशन सेव्हन’चे आव्हान स्वीकारण्याची प्रेरणा दिली. मोठे स्वप्न
‘ओशन सेव्हन’ची तुलना ओपन-वॉटर जलतरणातील माउंट एव्हरेस्टच्या सात शिखरांच्या मोहिमेशी केली जाते. जगातील सात प्रतिष्ठित आणि अत्यंत कठीण समुद्रमार्ग पार करणे हे प्रत्येक मॅरेथॉन जलतरणपटूचे मोठे स्वप्न मानले जाते.