‘पर्यटकांनो, परिस्थिती शांतपणे सांभाळा’

महाराष्ट्र टाइम्स
‘पर्यटकांनो, परिस्थिती शांतपणे सांभाळा’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
नेपाळ-तिबेटमध्ये भीषण पुरामुळे हजारो भाविक आणि पर्यटक दुर्गम भागात अडकले आहेत. यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकही आहेत. काठमांडू विमानतळाकडे जाणारा परतीचा रस्ता बंद झाल्याने आता परतायचे कसे, असा प्रश्न पर्यटकांसमोर आहे. मात्र आत्ताच्या परिस्थितीत धीर न सोडता आहे त्या परिस्थितीत आधी स्वतःला सांभाळा असे आवाहन महाराष्ट्रातील साहसी पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ करत आहेत.

बुधवारी नेपाळमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याआधी महाराष्ट्रातील काही पर्यटक सुखरूप जागी पोहोचले होते. हे पर्यटक आत्ता ११ हजार फूट किंवा त्यापेक्षा उंचावर आहेत. या पर्यटकांना सध्या परतीचा रस्ता बंद झाला आहे. मात्र यामुळे हवालदिल न होता या परिस्थितीत योग्य अन्न, पुरेसे पाणी पिऊन या उंचीवर आपली प्रकृती सांभाळावी आणि त्यासाठी पर्यटकांना मदत करावी असे आवाहन राज्यातील गिर्यारोहकांनी कैलास-मानसरोवर यात्रेच्या टूर लीडरना केले आहे.
महाराष्ट्रातील टूर लीडर आणि पर्यटकांशी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ संपर्कात असल्याचे महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी सांगितले. त्यांना धीर दिला जात आहे. या पर्यटकांमध्ये अनेक महिला आहेत तसेच ज्येष्ठ नागरिक आहेत. हे पर्यटक गिर्यारोहक नसल्याने दीर्घ काळ विरळ एवढ्या उंचीवर राहण्यासाठी त्यांनी खाण्यापिण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असेही झिरपे यांनी सांगितले. या परिस्थितीत यात्रेकरू, पर्यटकांनी शांत राहावे, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा आणि अतिउंचीवरील प्रतिकूल हवामानात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. या काळात पुरेसे पाणी पिणे, शरीर उबदार ठेवणे आणि उंचीमुळे होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष न करण्याचाही सल्ला त्यांनी दिला.

‘पुरामुळे अनेक रस्ते आणि पूल वाहून गेले असून, काही भागात दरडी कोसळल्याने संपर्क तुटला आहे. त्यामुळे शोध, बचाव, स्थलांतर आणि मदतकार्य आव्हानात्मक परिस्थितीत सुरू असल्याचे झिरपे यांनी नमूद केले. प्रशासन आणि बचाव पथके प्रभावित यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा वेळी यात्रेकरूंनी पूर आलेल्या नद्या, खराब झालेले रस्ते किंवा दरडप्रवण भाग स्वतःहून ओलांडण्याचा प्रयत्न करू नये’, असे आवाहनही गिर्यारोहकांकडून करण्यात आले आहे. आपल्या गटासोबत राहणे, गटप्रमुख आणि स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात राहणे आणि अधिकृत स्थलांतर मार्ग उपलब्ध होईपर्यंत संयम बाळगणे आवश्यक असल्याचे महासंघाने स्पष्ट केले.

सध्या या यात्रा मार्गावर तिबेटच्या बाजूने रस्ता खुला केला जाऊ शकतो. तिबेटमधून हा रस्ता नंतर काठमांडू विमानतळापर्यंत पर्यटकांना घेऊन येईल. मात्र हा प्रवास दोन देशांमधील असल्याने त्यासाठी चेकपोस्ट, इमिग्रेशनसाठी केंद्र अशी सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेणे गरजेचे आहे. ही तयारी करण्यासाठी एखाद- दोन दिवस लागू शकतात. त्यामुळे या काळात धीर धरून परिस्थितीला तोंड द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.