Anti rabies Vaccination Campaign Launched Amidst Stray Dog Issues In Kalyan
कल्याणात अँटी-रेबीज लसीकरण
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
कल्याण-डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांची वाढलेली दहशत आणि श्वानदंशाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहरात अँटी-रेबीज लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. महापौर हर्षाली थविल यांच्या हस्ते बिर्ला कॉलेज प्रभागात, तर नगरसेविका कांचन कुलकर्णी यांच्या उपस्थितीत गोविंदवाडी परिसरात या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात किमान २० हजार श्वानांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे महापौर थविल यांनी सांगितले.
कल्याण-डोंबिवलीत ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला एकाच दिवशी १००पेक्षा अधिक नागरिकांना श्वानदंशाचा त्रास सहन करावा लागला होता. श्वानदंशग्रस्त नागरिक दररोज रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. त्यातच ९ ऑगस्ट रोजी चिकनघर परिसरात १७ जणांना चावा घेणारा श्वान रेबीजग्रस्त असल्याचे निदान झाल्याने परिसरात घबराट पसरली होती.या सर्व नागरिकांना तातडीने अँटी-रेबीज लसीकरण करण्यात आले असून, त्यांना वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. अशा प्रकारे वाढता श्वानांचा उपद्रव रोखण्यासाठी आणि श्वानदंश झालेल्या व्यक्तींना रेबीजची लागण होऊ नये, यासाठी शहरातील सर्व श्वानांसाठी अँटी-रेबीज लसीकरण मोहीम राबवली जात आहे.
या मोहिमेत प्राणीमित्रांचे सहकार्य घेऊन जास्तीत जास्त श्वानांचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन महापौरांनी केले आहे. शहरात सुमारे ६० हजार भटके श्वान असून, त्यांचे टप्प्याटप्प्याने लसीकरण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात किमान २० हजार श्वानांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.