दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर खुलले हास्य

महाराष्ट्र टाइम्स
दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर खुलले हास्य
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
राखीच्या धाग्यातून नात्यांची वीण घट्ट करण्याबरोबरच सामाजिक बांधिलकीचा संदेश देत कोपरखैरणे येथील श्रमिक शिक्षण मंडळाच्या एफ. जी. नाईक महाविद्यालयाने यंदाचे रक्षाबंधन अनोख्या पद्धतीने साजरे केले. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या पर्यावरणपूरक राख्या नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील शिक्षण, प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्रातील दिव्यांग मुलांना बांधून आपुलकीचा धागा जोडला.

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातर्फे राखी बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्राचार्य प्रताप महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे १०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. पानं, फुलं, मसाले, पेपर क्विलिंग, क्रोशे, विणकाम, टिकल्या अशा विविध साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी आकर्षक आणि पर्यावरणस्नेही राख्या तयार केल्या.
या स्पर्धेत वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षातील प्राची डिके हिने लसूण आणि कांद्याच्या पातीपासून तयार केलेल्या अभिनव राखीला प्रथम क्रमांक मिळाला. प्रथम वर्ष वाणिज्य शाखेतील आर्या कांबळे हिने द्वितीय, तर स्नेहल घुळे हिने तृतीय क्रमांक पटकावला. गौरी वाडकर आणि सायली सणस यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

समाजसेविका डॉ. वंदना कुचिक आणि समाजसेवक डॉ. अरुण कुचिक यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनींनी या राख्या वाशी येथील ईटीसी केंद्रातील मुलांना बांधल्या. या मुलांनीही विद्यार्थिनींना भेटवस्तू देत रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणित केला. यावेळी प्राचार्य प्रताप महाडिक, समन्वयक डॉ. दत्तात्रय घोडके, सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षा प्रा. जयश्री दहाट, प्रा. समिधा पाटील, प्रा. सीमा शिंदे, प्रा. चिन्मयी वैद्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रमोद साळुंखे, सायकॉलॉजी विभागाच्या प्रा. नेहा भोरे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.