नवी दिल्ली : पूरग्रस्त नेपाळला केल्या जाणाऱ्या मदतीमध्ये भारताने वाढ केली आहे. भारताने गुरुवारी लष्कराच्या वाहतूक विमानातून नेपाळमध्ये मदतसामग्रीची दुसरी खेप पाठवली. भारताने यापूर्वी बुधवारी नेपाळला १० टन मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण साहित्य पाठवले होते.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. “नेपाळसाठी ३७.५ टन साहित्य, औषधे आणि अन्नपाकिटे घेऊन दुसरे विमान नुकतेच रवाना झाले आहे. भारत नेपाळी अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात आहे. सध्या सुरू असलेल्या मदतकार्याच्या आम्ही ठामपणे पाठीशी आहोत”, असे त्यांनी सांगितले. तिबेटलगतच्या नेपाळच्या सीमाभागात आलेल्या या प्रलयामुळे नेपाळला मोठा फटका बसला आहे. या आपत्तीत किमान १६० जणांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणावर विद्ध्वंस झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्याशी संवाद साधून परिस्थितीशी सामना करण्यासाठी शक्य ती सर्व मानवतावादी मदत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर काही तासांतच मदतसामग्रीची पहिली खेप पाठवण्यात आली. “या कठीण काळात भारतातील नागरिक नेपाळमधील आपल्या भगिनी-बंधूंसोबत एकजुचीने उभे आहेत”, असे पंतप्रधानांनी म्हटले होते. “भारत नेपाळला शक्य ती सर्व मानवतावादी मदत देण्यासाठी तयार आहे. आमची पथके बचाव आणि मदतकार्याबाबत समन्वय साधत आहेत”, असेही त्यांनी नमूद केले होते. या मदतसामग्रीमध्ये तात्पुरते निवारे, चादरी, स्वच्छता किट, सौर दिवे आणि औषधे यांसारख्या आपत्कालीन वस्तूंचा समावेश आहे. येत्या काही दिवसांत भारताकडून नेपाळला आणखी मदतसामग्री पाठवली जाणार असल्याचे समजते.