वाहतूक नियमनासाठी विद्यार्थी रस्त्यावर

महाराष्ट्र टाइम्स
students protest on the road for traffic safety
महामार्गालगत असलेल्या शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत नवी मुंबई वाहतूक पोलिसांतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘वन डे ट्रॅफिक कॉप्स’ उपक्रमाला सीवूड्स येथील ज्ञानदीप शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सीवूड्स वाहतूक शाखेच्या वतीने २५ ऑगस्ट रोजी दुपारी करावे गाव परिसरातील ज्ञानदीप शाळा, टी. एस. चाणक्य सिग्नल आणि करावे गाव कमान येथे ‘वन डे ट्रॅफिक कॉप्स’ उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत वाहतूक पोलिसांनी शाळेतील स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांना वाहतूक नियम, सिग्नलचे महत्त्व, रस्ता ओलांडताना घ्यावयाची काळजी, तसेच वाहनचालकांनी पादचाऱ्यांना द्यावयाचे प्राधान्य याबाबत मार्गदर्शन केले. यानंतर विद्यार्थ्यांनी वाहतूक पोलिसांसोबत रस्त्याच्या दोन्ही बाजूंची वाहतूक सुरक्षितपणे थांबवून शाळकरी मुलांना रस्ता ओलांडून देण्याचे प्रात्यक्षिक केले. ‘वाहतूक नियम केवळ पोलिसांसाठी नसून प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी आहेत,’ असा संदेश यावेळी देण्यात आला.
नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सीवूड्स वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहिनी लोखंडे आणि वाहतूक शाखेच्या अंमलदारांनी हा उपक्रम राबविला. यावेळी ज्ञानदीप शाळेचे मुख्याध्यापक तांडेल आणि सुमारे ६० विद्यार्थी उपस्थित होते.