हेलिकॉप्टर, ड्रोनद्वारे बचावकार्य

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
हेलिकॉप्टर, ड्रोनद्वारे बचावकार्य
(पान एकवरून)

माती-पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे अनेक जिल्ह्यांत हाहाकार उडाला. ‘महापुरात हजारो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. या आपत्तीच्या तीव्रतेचे अद्याप मूल्यमापन सुरू आहे’, असे नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खनाल यांनी सांगितले.
नेपाळच्या तीन जिल्ह्यांना प्रलयाचा मोठा तडाखा बसला आहे. आणखी काही मृतदेह गुरुवारी बाहेर काढण्यात आल्याने तेथील मृतांची संख्या ३५९वर पोहोचली असल्याचे पोलिसांनी सांगितले. नेपाळी लष्कराचे ४४ जवान, २८ नेपाळी पोलिस, सशस्त्र पोलिस दलातील १३ जवान बेपत्ता असल्याचे नेपाळी अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच जलविद्युत प्रकल्प आणि सीमाशुल्क विभागाच्या कार्यालयांतील १६० कर्मचारीही बेपत्ता असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

हिमकडे कोसळून किंवा हिमस्खलनामुळे हा विनाशकारी महापूर आल्याचा नेपाळ सरकार आणि अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे हिमकड्यांबरोबरच खडक आणि मातीचे ढिगारे ल्हेंदे नदीत आल्याने काही क्षण नदीचा प्रवाह रोखला गेला आणि नंतर भोटे कोशी आणि त्रिशुली नद्यांनाही महापूर असल्याचे सांगण्यात येते.

नेपाळच्या सीमेवरील तिबेट स्वायत्त प्रदेशातील गिरोंग शहराला महापुराचा फटका बसला. त्यात तिबेटमधील तिघांचा मृत्यू झाला असून, ५५८ जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी गुरुवारी पूरग्रस्त भागांत जाऊन पाहणी केली. त्यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा घेऊन मदतकार्याबाबत सूचना केल्या, असे चिनी सरकारी माध्यमांनी म्हटले आहे.