पर्यटकांवर अस्मानी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
tourists missing in nepal families call for help
(पान एकवरून)

त्यांच्या कुटुंबीयांनी सरकारला मदतीचे आवाहन केले आहे. कल्याण पश्चिमेकडे राहणारे संजय राजमल पाटील आणि नलिनी पाटील यांचाही संपर्क होत नसल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
अलिबागजवळील चौल येथील जय गिरनारी शिवदत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने नेपाळ येथे दर्शन व पर्यटनासाठी गेलेले रायगड जिल्ह्यातील ३७ भाविक अडकले आहेत. मात्र, सर्व भाविक सुरक्षित असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांच्यासोबत दोन डॉक्टरही असल्याने आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही अडचण नसल्याचे सांगण्यात आले.

नेपाळ सरकार, पर्यटन विभाग तसेच महाराष्ट्र सरकार यांच्याकडून रात्री उशिरापर्यंत पर्यटक बेपत्ता असल्याची माहिती देण्यात येत होती. महाराष्ट्रातील विविध टूर ऑपरेटर, साहसी पर्यटक, गिर्यारोहक यांच्याकडूनही या नातेवाइकांना कोणत्याच मार्गाने या यात्रेसाठी गेलेल्या यात्रेकरुंबद्दल माहिती मिळत नव्हती. राज्य आपत्कालीन संचालन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार सागा, मानसरोवरजवळ महाराष्ट्रातील ११४ नागरिक अडकले असून त्यातील ५३ नागरिक सुरक्षित होते. रिचा टूर्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेद्वारे दोन गाड्यांमधून पर्यटक मानस सरोवर येथे गेले होते. त्यापैकी एका गाडीत जवळपास ३७ जण सुरक्षित आहेत, असे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

या व्यतिरिक्त राज्यातील १५० नागरिक मानसरोवरजवळ सुरक्षित असल्याचेही राज्य आपत्कालीन संचालन केंद्राद्वारे सांगण्यात आले.

नेपाळ, लडाख, भुतान येथे कार्यरत असलेल्या एका पर्यटन व्यावसायिकांनी पूरस्थिती निर्माण होण्याच्या अवघा एक तास आधी तिथे पोहोचलेल्या एका ओळखीच्या पर्यटकाने इमिग्रेशन केंद्र येथून एक फोटो पाठवल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर या पर्यटकाचा संपर्क होत नसल्याने हा आनंदाचा क्षण शेअर केल्यानंतर पुढे काय, याचा अंदाजच येत नसल्याची प्रतिक्रिया पर्यटक व्यावसायिकांनी दिली.

अवघ्या काही क्षणांमध्ये प्रत्यक्ष परिस्थिती समजण्याचा मार्गच बंद झाल्याने या नातेवाइकांसमोर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. रुसावागढी येथील इमिग्रेशन केंद्र हे पाच मजली असून त्यावरून पाण्याचा लोंढा आल्याने त्या पाण्याच्या लोंढ्याची ताकद किती अफाट असेल, याचा अंदाज वर्तवता येतो, असे ईशा टूर्सचे आत्माराम परब यांनी सांगितले. दिवसभर विविध भागांमधून यात्रेकरूंच्या नातेवाइकांचे फोन येत असून बेपत्ता या माहितीशिवाय कोणतीही अधिकृत माहिती त्यांना देता येत नसल्याची खंत परब यांनी व्यक्त केली. या केंद्रावर सकाळी ८.३० ते १० पर्यंत सर्वाधिक गर्दी असते असे ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी सांगितले. या वेळेत तिबेटमध्ये जाणारी तसेच तिबेटहून यात्रेवरून माघारी परतणारी लोक प्रवास करतात. लोंढा ज्यावेळी आला ती सकाळची वेळ होती. त्यामुळे इमिग्रेशन केंद्रामध्ये सर्वाधिक गर्दी होती. त्यामुळेच यात्रेकरू मोठ्या संख्येने बेपत्ता असल्याचे झिरपे म्हणाले.