श्रमदानातून स्मशानभूमीची डागडुजी आणि स्वच्छता

महाराष्ट्र टाइम्स
श्रमदानातून स्मशानभूमीची डागडुजी आणि स्वच्छता
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
गेल्या चार दशकांपासून दुर्लक्षित असलेल्या जावसई गावातील स्मशानभूमीची दुरवस्था दूर करण्यासाठी स्थानिक तरुणांनी पुढाकार घेऊन श्रमदानातून डागडुजी आणि स्वच्छता केली आहे. विशेष म्हणजे या कामासाठी लागणारा निधीही त्यांनी आपापसांत वर्गणी काढून जमवला. त्यांच्या या सकारात्मक उपक्रमाचे शहरात कौतुक होत आहे.

अंबरनाथच्या पश्चिम विभागात केंद्र शासनाच्या आयुध निर्माणी कारखान्याच्या मागे जावसई गाव आहे. अलीकडेच गावातील एका व्यक्तीचे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेनिमित्त जमलेल्या तरुणांना स्मशानभूमीची दुरवस्था खटकली. ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करायचे, ती जागा अतिशय बिकट अवस्थेत होती. तिथे नीटपणे उभे राहण्यापुरतीही जागा नव्हती. तिथपर्यंत जाण्यासाठी साधी पायवाटही नव्हती. स्मशानभूमीची ही अवस्था बदलण्याचा निर्धार तरुणांनी केला. कामाचे नियोजन झाले. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सकाळी ९ ते रात्री ९ असे तब्बल १२ तास ग्रामस्थांनी श्रमदान केले. सुमारे ५० ग्रामस्थांनी हातात कुदळ, फावडा, घमेले आणि कोयते घेऊन स्मशानभूमीसाठी श्रमदान केले. एक कट्टा बांधला. पायवाट तयार केली.
या मोहिमेसाठी गावातील अरुण ठाकरे, संतोष मुसळे, विकी पाटील, विजय चौधरी, सुधा चौबे, हरेश गणेश, राहुल जमदरे, अक्षय दुर्गे, सागर शेकटे, शिवाजी शेलार, रवी मुसळे, अमोल दुर्गे, जगदीश ठाकरे, दर्शन जमदरे, संतोष चव्हाण, गणेश मुसळे, हरेश हरड, प्रथमेश शेलार आदींनी पुढाकार घेतला.