सण आला वर्षाचा, नारली पुनवेचा!

महाराष्ट्र टाइम्स
सण आला वर्षाचा, नारली पुनवेचा!
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
ठाणे , नवी मुंबईतील कोळीबांधवांनी पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहाने गुरुवारी नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला. नवी मुंबईतील दिवाळे, सारसोळे, वाशी गाव, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली यांसह विविध कोळीवाड्यांमध्ये नारळी पौर्णिमेचा उत्साह दिसून आला. समुद्रदेवतेची विधिवत पूजा करून मच्छीमार बांधवांच्या सुरक्षिततेसह कुटुंबांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. या वेळी समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करण्याची पारंपरिक प्रथाही भक्तिभावाने पार पडली.

आगरी-कोळी समाजाच्या सांस्कृतिक परंपरेत नारळी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आगामी मासेमारीचा हंगाम सुखरूप आणि समृद्धीचा जावा, यासाठी या दिवशी दर्याराजाची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण केला जातो. समुद्राबद्दलची कृतज्ञता आणि निसर्गाशी असलेले नाते या परंपरेतून अधोरेखित होते.
दिवाळे कोळीवाड्यात ग्रामस्थांच्या वतीने ‘नारळ सोन्याचा, दिवाळे गावचा’ या विशेष उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक पद्धतीने समुद्रदेवतेची पूजा करून समुद्र आणि पर्यावरणाच्या संरक्षणाचा संकल्प करण्यात आला. या उत्सवातून कोळी समाजाच्या पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि सागरी जीवनशैलीचे दर्शन घडले. माजी आमदार संदीप नाईक यांनी उत्सवात सहभागी होत कोळी बांधवांच्या आनंदात सहभाग घेतला.

सारसोळ्यात पालखी

सारसोळे ग्रामस्थांच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त भव्य पारंपरिक पालखी मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक कोळी गीतांचा ठेका आणि मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या कोळी बांधवांच्या उत्साहामुळे परिसर दुमदुमून गेला. संदीप नाईक यांनी आगरी-कोळी बांधवांच्या सुख, समृद्धीसाठी प्रार्थना केली. महापौर सुजाता पाटील, नगरसेवक सुरज पाटील, नगरसेविका रूपाली भगत यांच्यासह स्थानिक नागरिक आणि मोठ्या संख्येने कोळी बांधव मिरवणुकीत सहभागी झाले होते.

समुद्रदेवतेची पूजा

ऐरोली दिवा कोळीवाड्यात ग्रामस्थ आणि समाजसेवक मोरेश्वर केणी यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली. वाजत-गाजत समुद्रकिनारी पोहोचल्यानंतर समुद्रदेवतेची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर होडीतून समुद्रात जाऊन सोन्याचा नारळ समुद्राला अर्पण करण्यात आला. मच्छीमार बांधवांची सुरक्षितता आणि कुटुंबांच्या सुख-समृद्धीसाठी या वेळी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

ठाण्यात सीमांकनाचा मुद्दा

पर्यावरणाचे संवर्धन आणि कोळीवाड्यांच्या सिमांकनाचा मुद्दा मांडत यंदाची नारळी पौर्णिमेची मिरवणूक ठाण्यात गुरुवारी निघाली. चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट व चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंचातर्फे यंदाच्या मिरवणुकीत या वैशिष्ट्यपूर्ण विषयावर अनोखा संदेश देण्यात आला. चेंदणी कोळीवाड्यात साजरा करण्यात आलेला रौप्यमहोत्सवी नारळी पौर्णिमेचा उत्सव यंदाही उत्साहात झाला. ठाणे पूर्व चेंदणी कोळीवाड्यातील विठ्ठल मंदिरातून सुरू झालेली मिरवणूक पश्चिम कोळीवाड्यातील दत्त मंदिर पुढे सिडको स्टॉप, ग. मो. कोळी मार्गे नारायणराव कोळी चौकातून चेंदणी कोळीवाडा विसर्जन घाटावर दाखल झाली. त्यानंतर त्याठिकाणी २५ सौभाग्यवतींची ओटी भरण्यात आली. त्यानंतर या २५ दाम्पत्यांच्या हस्ते नारळ खाडीत अर्पण करण्यात आला.