शहापूरमध्ये शेकडो महिलांचा मोर्चा

महाराष्ट्र टाइम्स
शहापूरमध्ये शेकडो महिलांचा मोर्चा
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
आदिवासीबहुल शहापूर तालुक्यातील अनेक महिला केवळ ई-केवायसी आणि तांत्रिक अडचणींमुळे लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहिल्या आहेत. या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली गुरुवारी एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयावर शेकडो महिलांचा मोर्चा नेण्यात आला.

शहापूर तालुका १०० टक्के अनुसूचित क्षेत्र आहे. तालुक्यातील दुर्गम वाड्या-वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासी व कातकरी कुटुंबे वास्तव्यास आहेत. शासनाने २८ जून, २०२४ रोजी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली. ३ जुलै, २०२४च्या शासन निर्णयानुसार २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांचा यात समावेश करण्यात आला. मात्र, शहापूर तालुक्यातील दुर्गम भागात इंटरनेट, मोबाइल व बँकिंग सुविधांचा अभाव असल्याने, तसेच ई-केवायसी, आधार लिंक, बँक खात्यातील त्रुटी अशा तांत्रिक अडचणींमुळे अनेक अशिक्षित आणि गरीब महिलांचा सन्मान निधी प्रलंबित राहिला आहे.
या योजनेचा उद्देश महिलांना स्वावलंबी बनवणे हा असताना केवळ डिजिटल प्रक्रियेतील त्रुटींमुळे आदिवासी महिलांना वंचित ठेवणे अन्यायकारक आहे, असे संघटनेचे मत आहे. ई-केवायसी, बँक खाते व आधार जोडणीतील अडचणी दूर करण्यासाठी दुर्गम वाड्या-वस्त्यांमध्ये विशेष शासकीय शिबिरे आयोजित करावीत, अशी संघटनेची मागणी आहे.