Massive Protest Against Cluster In Thane Question Mark On Development Company
ठाण्यात ‘क्लस्टर’विरोधात धडक मोर्चा
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत क्लस्टर पुनर्विकास योजना राबवण्यासाठी ‘क्लस्टर विकास कंपनी’ स्थापन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या कंपनीसह क्लस्टर पुनर्विकासाचा कारभार नियोजनशून्य सुरू असल्याचा आरोप करत गुरुवारी ठाणे शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या धडक मोर्चात हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरत तीन हात नाका ते क्लस्टर पुनर्विकास कार्यालयावर धडक दिली. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याचा आरोपही होत असतानाच, प्रशासनाला या प्रकल्पातील दिरंगाई आणि अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने या प्रकल्पावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.ठाण्यात क्लस्टरची अंमलबजावणी ‘क्लस्टर विकास कंपनी’ला देण्याच्या ठरावाला सभागृहाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह सत्तेत सहभागी असलेल्या भाजपनेही विरोध केला आहे. सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर केल्याचा आरोप या दोन पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी केला. या ठरावामुळे ठाणे शहरातील विकासात्मक धोरणे ठरवण्याचा अधिकार पालिकेऐवजी कंपनीला मिळणार असल्याचा आरोप करत हा मोर्चा काढण्यात आला होता.
ही कंपनी म्हणजे ‘तैनाती फौज’ असल्याचा आरोप करत कंपनीच्या हातातील क्लस्टरचा कारभार काढून घ्यावा, अशी मागणी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केली.
महापालिकेचे उपायुक्त दीपक झिंजाड यांना आव्हाड यांच्यासह पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, पालिका गटनेते अभिजित पवार, विरोधी पक्षनेते शानू पठाण, नगरसेवक सुधीर भगत, मनीषा भगत यांनी याप्रश्नी निवेदन सादर केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांना भारतीय संविधानाच्या ७४ व्या घटनादुरुस्ती कायदा, १९९२ नुसार कलम २४३-डब्ल्यू अन्वये दिलेल्या अधिकारांचा भंग केला आहे, असा आरोप यावेळी जिल्हाध्यक्ष प्रधान यांनी केला. आज सर्वसामान्य ठाणेकरांचा मालमत्ता कर १२ टक्के आणि २० टक्के वाढवत असताना, असे १३० कोटी रुपये तुम्ही क्लस्टर कंपनीला देता? या कंपनीत कोण आहेत; त्यांची नावे जाहीर करा, असा प्रश्न प्रधान यांनी उपस्थित केला.