रिक्षांच्या विक्रमी रांगा

महाराष्ट्र टाइम्स
रिक्षांच्या विक्रमी रांगा
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
रेल्वे स्थानकापासून रिक्षा मिळावी म्हणून पूर्वेकडून रेल्वे पुलावरून प्रवाशांना पश्चिमेपर्यंत लांबच लांब रांग लावावी लागते. डोंबिवलीसाठी ही रांग आता विश्वविक्रमी बनली आहे. या रांगेतील नागरिकांना रिक्षा मिळण्यासाठी तब्बल दोन ते अडीच तास प्रतीक्षा करावी लागते.

दिवसभर काम करून लोकलचे धक्के खात डोंबिवली स्थानकात उतरताच प्रवाशांना रिक्षासाठी रांगा लावाव्या लागतात. लांब पल्ल्याच्या भाड्याला पसंती देणाऱ्या रिक्षाचालकांकडून जवळच्या प्रवाशांना भाडे नाकारले जाते. प्रवासी प्रामाणिकपणे रिक्षासाठी रांगा लावत असले, तरी किती तरी वेळ स्टँडवर रिक्षाच येत नसल्याने प्रवाशांची रांग लांबत जाते. यावर तोडगा म्हणून प्रवाशांनी सागर्ली, मानपाडा, डी-मार्ट आणि शनिमंदिर या एकाच मार्गावर जाण्यासाठी स्वतंत्र चार रांगा लावण्यास सुरुवात केली. तरीही सायंकाळी ६नंतर डोंबिवली ते पलावापर्यंतच्या मार्गातील मधल्या प्रवाशांना दोन ते तीन तासांची दीर्घ प्रतीक्षा करावी लागते. प्रवाशांची रांग पूर्वेकडून थेट रेल्वे पुलावरून पश्चिमेकडील बाजूस रस्ता ओलांडून पोहोचलेली असते.
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, रात्री ८ वाजता रांगेत उभ्या राहिलेल्या प्रवाशाला दोन ते अडीच तासांच्या प्रतीक्षेनंतर रिक्षात बसण्याची संधी मिळते. त्यानंतर वाहतूक कोंडीतून कसाबसा श्वास घेत अर्ध्या ते पाऊण तासानंतर इच्छित स्टॉपवर उतरून प्रवाशांना घर गाठण्यासाठी मध्यरात्र उलटते. लोकप्रतिनिधींना मात्र प्रवाशांच्या या त्रासावर उपाययोजना करण्यासाठी मुहूर्त मिळलेला नाही.

मानपाडा रोड थेट पलावापर्यंत तसेच मागील काही वर्षांत प्रीमियम कंपनीच्या प्रशस्त जागेत अनेक संकुलांनी बाळसे धरले आहे. तर भोपर, सागाव, सागर्ली परिसरातील इमारतीही आकाशाला गवसणी घालत आहेत. आधीच दाटीवाटीने वसलेल्या डोंबिवलीत लोकसंख्या वाढत असताना, वाहतुकीसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नाही. रिक्षाचालकांकडून भाडेवाढीची मागणी केली जात असली, तरी कमी भाडे असलेल्या मार्गावर रिक्षाचालकांकडून सेवा देण्यास टाळाटाळ केली जाते. तर लांबच्या मार्गावर जाण्यासाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. दरम्यान, प्रवाशांच्या या दररोजच्या समस्येवर संबंधित विभागांनी एकत्रित येत तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.