Serious Meeting Of Water Supply Minister On Water Scarcity
पाणीटंचाईची समस्या मंत्र्यांच्या दारी
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
अंबरनाथ शहरात ऐन पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर लोकप्रतिनिधींकडून आंदोलने, मोर्चे आणि उपोषणे करूनही तोडगा निघत नसल्याने अखेर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुंबई येथील निवासस्थानी स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या पुढाकाराने सर्वपक्षीय नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
यावेळी शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम, सुरळीत आणि नियोजनबद्ध करण्याच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करण्यासह विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नगरसेवकांना पाणीपुरवठा मंत्री पाटील यांच्याकडून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले. शहरात विशेषतः उन्हाळ्यात उद्भवणारी पाणीटंचाई यंदा ऐन पावसाळ्यातही जाणवली. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून अंबरनाथमधील मजीप्रा कार्यालयात शिवसेना, भाजपसह सर्वपक्षीय नगरसेवकांकडून पाणीटंचाईविरोधात धडक दिली जात आहे. मात्र त्यानंतरही पाणीटंचाई कायम असल्याने रहिवाशांमध्ये लोकप्रतिनिधींबाबतही संताप वाढत होता.अखेर मजीप्रासमोर हतबल झालेल्या नगरसेवकांनी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याकडे पाणीटंचाईबाबत समस्या मांडली. त्यानंतर शहरातील पाणीटंचाईची समस्या मार्गी लावण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दालनात आमदार डॉ. बालाजी किणीकर तसेच सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत अमृत टप्पा-२ योजनेतील कामांचा आढावा, आवश्यक ठिकाणी फ्लो मीटर बसवणे, जलकुंभांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे निर्माण होणारी पाणीपुरवठ्याची अडचण दूर करण्यासाठी जनरेटरची व्यवस्था करणे, नियोजनबद्ध पाणी सोडण्याची व्यवस्था करणे, जावसई, फुलेनगर व नारायणनगर परिसरातील आवश्यक ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकणे, पाणीचोरी रोखण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करणे तसेच वॉलमन व्यवस्था अधिक सक्षम करणे, यांसह इतर महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.
अंबरनाथकरांना भेडसावणाऱ्या पाणी समस्यांवर तातडीने ठोस उपाययोजना करण्याचे आदेश देत, येत्या १५ दिवसांत शहरातील पाणीपुरवठ्यात निश्चितच सकारात्मक बदल जाणवतील, असे आश्वासन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.