Special Girls Tie Rakhi To Soldiers A Social Message Of Raksha Bandhan
विशेष मुलींची जवानांना राखी
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून ठाण्यातील जागृती पालक संस्थेच्या विशेष मुलींनी गुरुवारी ठाणे महापालिकेच्या आपत्ती प्रतिसाद दलातील, अर्थात टीडीआरएफ आणि एनडीआरएफच्या जवानांना राख्या बांधल्या. विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या जागृती पालक संस्थेच्या विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या जवानांच्या मनगटावर बांधताच उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
ठाण्यातील जागृती पालक ही विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या वतीने रक्षाबंधनाचा सण सामाजिक बांधिलकी जपत उत्साहात साजरा केला जातो. यापूर्वी अग्निशमन दलाचे जवान, सफाई कर्मचारी, वाहतूक पोलिस, ज्येष्ठ नागरिक आणि मनोरुग्णांना राख्या बांधून या विशेष मुलींनी रक्षाबंधन साजरे केले होते.यंदा संस्थेच्या विशेष मुलींनी टीडीआरएफ आणि एनडीआरएफच्या जवानांना राख्या बांधून त्यांच्या सेवाभावाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या सोहळ्यामुळे विशेष मुलींचा आनंद द्विगुणित झाल्याचे संस्थेचे रहीम मुलाणी यांनी सांगितले. टीडीआरएफचे मोहन सातपुते आणि त्यांची टीम, तसेच एनडीआरएफचे एस. एस. बत्रा आणि पथक या सोहळ्याला उपस्थित होते.