Traffic Safety Message On The Occasion Of Raksha Bandhan
राखीच्या धाग्यातून सुरक्षेचा संदेश
महाराष्ट्र टाइम्स•
वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी ठाणे शहरात एक अनोखा उपक्रम राबवला. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना दंड न ठोठावता महिला वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हातावर राखी बांधत ‘आपली सुरक्षितता हीच कुटुंबासाठी खरी भेट’ हा संदेश दिला.
ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलिस सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या सूचनेनंतर वाहतूक शाखेच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी सहायक पोलिस आयुक्त अंजली भोईर, पोलिस निरीक्षक रोहिणी सोनार, गौरी मोरे यांच्यासह वाहतूक शाखेतील महिला पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम आणि संरक्षणाचा सण मानला जातो. याच भावनेचा आधार घेत पोलिसांनी वाहतूक सुरक्षेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवला. दंडाची भीती दाखवण्यापेक्षा आपुलकीने नियम समजावून सांगितल्यास त्याचा अधिक सकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितले.