‘आय ॲम मलाला’च्या वाचन सत्रावर हल्ला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
attack on i am malala reading session by malala yousafzai
नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मलाला युसूफझाई यांच्या ‘ आय ॲम मलाला ’ या आत्मचरित्राच्या अहमदाबाद शहरात आयोजित करण्यात आलेल्या वाचन सत्राला हिंसक वळण लागले. उजव्या विचारसरणीच्या एका गटाने या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांवर हल्ला केल्याचे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. गुरुवारी संध्याकाळी वस्त्रपूर गार्डनमध्ये झालेल्या या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

वाचनासाठी महिलांसह सुमारे २० जणांचा एक गट सार्वजनिक बागेत जमला होता. त्यांच्या पुस्तकाच्या निवडीवरून बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या १८ ते २० सशस्त्र व्यक्तींच्या गटाने त्यांना विरोध केला. वाचन सत्रानंतर वाचक बागेतून बाहेर पडत असताना सुमारे १८ ते २० लोक तेथे आले आणि त्यांनी मलाला यांचे आत्मचरित्र का वाचले, अशी विचारणा केली. त्यानंतर झालेल्या बाचाबाचीतून झटापट झाली. त्यात दोन जण जखमी झाले. हल्लेखोरांकडे काठ्या होत्या, असे वस्त्रापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक जी. एम. चौधरी यांनी सांगितले. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून, आरोपींपैकी दोघे पीडितांच्या ओळखीचे होते. त्यांच्याव्यतिरिक्त सहा जणांची ओळख पटली आहे.
‘अज्ञान आणि त्याला जोडलेला जातीयवाद ही एक असाध्य व्याधी आहे,’ अशा शब्दांत काँग्रेस नेते पवन खेरा यांनी या प्रकरणावर ‘एक्स’वरून टीका केली. ‘बजरंग दलाच्या सदस्यांनी वाचन कार्यक्रमात व्यत्यय आणला आणि मलाला युसुफझाई यांचे पुस्तक वाचत असलेल्या एका नागरी समाज गटावर हल्ला केला. नेहमीप्रमाणे ज्या गोष्टी त्यांना समजत नाहीत, त्यात नाक खुपसण्याच्या त्यांच्या सवयीने त्यांच्यावर मात केली,’ असे त्यांनी म्हटले आहे.