Driver In Coma After Severe Assault Police Officer Charged
कोमात जाईपर्यंत मारहाण
महाराष्ट्र टाइम्स•
भोसले यांच्यावर ४१ दिवस उपचार करण्यात आले. त्यानंतर ११ जुलै २०२६ रोजी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मात्र, प्रकृती पूर्णपणे सुधारली नसल्याने कुटुंबीयांनी त्यांना कर्वेनगर येथील न्युरो केअर सेंटरमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान ते हळूहळू शुद्धीवर आले. त्यानंतर कोरेगाव पार्क पोलिसांनी १८ ऑगस्ट रोजी भोसले यांचा जबाब नोंदविला. हा जबाब करमाळा पोलिस ठाण्याकडे पाठविण्यात आल्यानंतर २१ ऑगस्ट रोजी अमित जाधव याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर २२ ऑगस्ट २०२६ रोजी करमाळा पोलिसांनी त्याला अटक केली.
करमाळा एसटी बसस्थानकाजवळ पत्नीला मारहाण करणाऱ्या पोलिस अंमलदाराला अडविण्यासाठी मध्ये पडलेल्या चालकाला त्याने बेदम मारहाण केली. डोक्यात काठीने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला चालक बेशुद्ध होऊन कोमात गेला. अडीच महिन्यांनी शुद्धीवर आल्यानंतर त्याने दिलेल्या जबाबावरून पुणे पोलिस दलाच्या मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या अमित सुरेश जाधव (वय ४२, रा. भवानी पेठ) याच्याविरुद्ध करमाळा पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी जाधवला अटक करण्यात आली असून, पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी त्याच्या निलंबनाचा आदेश दिला.याबाबत शुभम चंद्रकांत भोसले (वय २७, रा. मंगळवार पेठ) यांनी करमाळा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. भोसले हे चालक म्हणून काम करतात. ३१ मे २०२६ रोजी ते मित्र प्रथमेश चव्हाण यांची कार घेऊन अमित जाधव यांच्या पत्नी, आई, बहीण आणि दोन मुलांना देवदर्शनासाठी घेऊन गेले होते. विविध ठिकाणी देवदर्शन केल्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास ते करमाळा एसटी बसस्थानकाजवळ चहा-नाश्त्यासाठी थांबले होते.
त्या वेळी अमित जाधव याने अचानक पत्नी, आई आणि बहिणीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पत्नीला मारहाण केल्याने शुभम भोसले आणि प्रथमेश यांनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, जाधवने त्यांचे ऐकले नाही. उलट मध्यस्थी करणाऱ्या भोसले यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर जवळ पडलेल्या झाडाच्या काठीने त्यांच्या हातावर, पायावर आणि डोक्यावर प्रहार केला.
डोक्यात काठीचा जोरदार घाव बसल्याने भोसले खाली कोसळले. त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव होऊन ते बेशुद्ध झाले. त्यांच्यावर करमाळा येथे उपचार करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यात दाखल करण्यात आले.