Police Seize Three Pistols And Live Cartridges In Ambegaon Plateau
सराईतांकडून तीन पिस्तुले, चार जिवंत काडतुसे जप्त
महाराष्ट्र टाइम्स•
कात्रज आणि आंबेगाव पठार परिसरात देशी बनावटीची पिस्तुले घेऊन फिरणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
ओंकार ऊर्फ बब्या संतोष पवार (वय १८, रा. तापकीर चाळ, आंबेगाव पठार, धनकवडी) आणि शिरीष जितेंद्र खोपडे (वय २६, रा. श्री गणेश निवास, आंबेगाव पठार, धनकवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.आंबेगावमधील साईसिद्धी चौकात पवार पिस्तूल घेऊन थांबल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या तपास पथकाला मिळाली होती. खातरजमा करून पोलिसांनी सापळा रचला. पवार तेथे आल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन झडती घेण्यात आली. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. पवारकडे केलेल्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, खोपडे हा कात्रज डेअरी परिसरात असल्याचे तपास पथकाला समजले. त्याच्याकडेही देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी कात्रज डेअरी परिसरात सापळा रचून खोपडेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले आणि दोन काडतुसे हस्तगत करण्यात आली. पवार आणि खोपडे यांनी पिस्तुले नेमक्या कोणत्या उद्देशाने बाळगली होती, त्यांना हा शस्त्रसाठा कोणी उपलब्ध करून दिला आणि त्यांचा आणखी कोणाशी संपर्क आहे का, या दिशेने तपास करण्यात येत आहे.
वरिष्ठ निरीक्षक सुदर्शन गायकवाड, गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष जाधव, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, रवी जाधव, सागर बोरगे, मितेश चोरमले, नीलेश खैरमोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.