पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्या मालिकेतील दुसरी क्रिकेट कसोटी मैदानाबाहेर गाजण्याची चिन्हे दिसत होती. या मालिकेच्या प्रक्षेपणाचे हक्क असलेल्या ‘स्काय स्पोर्ट्स’ने कसोटी सुरू होण्याच्या सुमारास इम्रान खान यांच्या मुलांची मुलाखत प्रसारीत केली, त्यावरून पाकिस्तानने या कसोटीवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती.
पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार; तसेच माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या तुरुंगात आहेत. कासिम आणि सुलामान खान या इम्रान यांच्या मुलांची मुलाखत ‘स्काय’ने घेतली. ही मुलाखत ‘लॉर्ड्स’वरच ध्वनिचित्रमुद्रित करण्यात आली. त्यातच ही मुलाखत दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी उपाहारादरम्यान प्रसारीत करण्यात आली. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) संतापले.पीसीबीने या कसोटीवरील बहिष्काराची तयारी सुरू केली होती; मात्र त्यांचे मन वळवण्यात इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारी यशस्वी ठरले. पाकिस्तानात ही मुलाखत प्रसारीत करण्यात आली नाही.
इम्रान यांना २०२३च्या ऑगस्टमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप ठेवून अटक करण्यात आली. त्यांना १४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ते सध्या रावळपिंडी येथील आदियाला जेलमध्ये आहेत. त्यांच्या सुटकेची मागणी २१ माजी कर्णधारांनी केली आहे. त्यात इंग्लंडचे माईक आथरटनही आहेत. त्यांनीच ही मुलाखत घेतली.
‘आमचे वडील तुरुंगात असुरक्षित आहेत. त्यांना मारण्याचे प्रयत्न झाले आहेत,’ असा दावा इम्रान खान यांच्या मुलांनी मुलाखतीत केला आहे.
इम्रान खान यांच्या मुलाच्या मुलाखतीवरून पाक बोर्ड आक्रमक होईल, असे वाटत असतानाच ते शांत झाले. त्यावरून पाकिस्तानातील अनेकांनी पाक बोर्डावर टीका केली आहे. आशिया टी-२० स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी पाक खेळाडूंसह हात मिळवण्यास नकार दिला. त्या वेळी सामंनाधिकारी असलेल्या अँडी पायक्रॉफ्ट यांनी भारतीय संघावर कारवाई केली नाही. त्याच्या निषेधार्थ आशिया कपमधील अमिरातीच्या लढतीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा पाक बोर्डाने केली. प्रत्यक्षात या सामन्यासाठी पाकचा संघ मैदानात उतरला होता, याची आठवण करून देण्यात येत आहे.