रविवार पेठेत भीषण आग

महाराष्ट्र टाइम्स
रविवार पेठेत भीषण आग
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
अरुंद रस्त्यामुळे अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी नेण्यात अडथळे निर्माण झाले. त्यातच आग पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने जवानांसमोर आणखी आव्हान निर्माण झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी विविध उपाययोजना करून आग आटोक्यात आणण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवले. दरम्यान, आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, हे स्पष्ट झालेले नाही. आगीमध्ये किती नुकसान झाले, याची माहितीही उपलब्ध होऊ शकली नाही.

रविवार पेठेतील बोहरी आळी येथील एका इमारतीच्या टेरेसवर असलेल्या गोदामाला शुक्रवारी रात्री भीषण आग लागली. आगीचे लोळ उठल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली.
गोंधळाचे वातावरण

रविवार पेठेतील बोहरी आळी परिसरात कायम मोठी गर्दी असते. अरुंद रस्ते आणि दुकानांची दाटी यामुळे या भागात अनेकदा वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होते. विशेषतः सणासुदीच्या काळात खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने आग लागल्याच्या घटनेने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

मुख्य रस्त्यावर असलेल्या पाच मजली इमारतीमध्ये रमेश ट्रेडिंग कंपनीचे फुले आणि विविध सजावटीच्या साहित्याचे घाऊक विक्रीचे दुकान आहे. या इमारतीच्या टेरेसवर साहित्य साठविण्यासाठी गोदाम करण्यात आले होते.

शुक्रवारी सायंकाळी साडेआठच्या सुमारास या गोदामातून अचानक धूर येऊ लागला. त्यानंतर काही वेळातच आगीने मोठे स्वरूप धारण केले.

नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब आणि पाण्याचा एक टँकर घटनास्थळी दाखल झाला. तोपर्यंत गोदामातील आग मोठ्या प्रमाणात पसरली होती. आगीचे मोठे लोळ बाहेर येत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.