विश्वासाच्या नात्याला रेशीमधाग्याची बळकटी

महाराष्ट्र टाइम्स
sale of products made by inmates on the occasion of raksha bandhan
बंदींच्या कलागुणांना वाव मिळावा आणि वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘ रक्षाबंधन ’ सणाचे औचित्य साधून बंदीनिर्मित वस्तूंच्या प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे उद्घाटन कारागृह व सुधारसेवा महासंचालक डॉ. सुहास वारके यांच्या उपस्थितीत सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा पवार-साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. ‘सुधारणा व पुनर्वसन’ या योजनेअंतर्गत कारागृहाने दिलेल्या प्रशिक्षणातून बंदींनी तयार वस्तू प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. यामध्ये या प्रदर्शनात बंदींनी तयार केलेले फर्निचर, शोभेच्या वस्तू, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, कपडे, बेकरी पदार्थांसह विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कारागृह हे केवळ शिक्षेचे ठिकाण नसून, ते सुधारगृह आहे. बंदींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे त्यांना रोजगारक्षम बनविणे आवश्यक असल्याचे मत वारके यांनी व्यक्त केले. माहेर महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा विद्या म्हात्रे या वेळी उपस्थित होत्या.

मनगटावर बांधलेल्या रेशमी धाग्यातून भावाबहीणीच्या अनोख्या विश्वासाच्या, प्रेमाच्या नात्यातील ऋणानुबंधांची वीण घट्ट करीत शुक्रवारी घराघरात राखीपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. सामाजिक संघटनांतर्फे विविध उपक्रमांनी राखीपौर्णिमा साजरी करण्यात आली. सामाजिक सुरक्षेसाठी अहोरात्र झटणारे पोलिस, सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
राखीपौर्णिमेनिमित्ते अनेकांना सुट्टी असल्याने घराघरांमध्ये सकाळपासून ‘गेटटुगेदर’चे नियोजन करण्यात आले होते. अनेक कुटुंबांनी राखीपौर्णिमेचे जेवण घरी करण्याऐवजी हॉटेलमध्ये करण्याचा बेत रचला होता.

जवानांप्रति कृतज्ञता

श्री शिवाजी मित्र मंडळ आणि साईनाथ मंडळ ट्रस्ट यांच्यातर्फे देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय जवानांना कृतज्ञतेचा रेशीम धागा बांधून राखीपौर्णिमा साजरी करण्यात आली. या वेळी ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे यांनी ‘ऐ मेरे वतन के लोगों...’ हे गीत सादर केले, तर गायक राजेश दातार यांनी ‘फुलों का तारों का, सब का कहना है’ हे रक्षाबंधनाचे लोकप्रिय गीत सादर केले. या उपक्रमासाठी ॲडमिन ऑफिसर मेजर प्रमोद जोशी; तसेच यू. पी. शुक्ला यांचे विशेष सहकार्य लाभले. या वेळी शिवव्याख्याते सौरभ कर्डे, ऋत्विक अद्मुलवार, गंधाली शाह, उमेश शेवते, पूजा कर्डे, आनंदी शेवते उपस्थित होते. साईनाथ मंडळ ट्रस्टचे पीयूष शाह आणि श्री शिवाजी मित्र मंडळाचे प्रल्हाद भाऊ थोरात यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

पुण्यापासून सीमेपर्यंत...

श्री पांडुरंग आदर्श सेवा ट्रस्ट आणि ‘आम्ही पुणेकर’ संस्थेतर्फे ‘पुण्यापासून सीमेपर्यंत... राखीच्या धाग्यातून राष्ट्राशी नातं!’ या रक्षाबंधन यात्रेअंतर्गत जम्मू-काश्मीरमधील पूंच, केरन आणि उरी बॉर्डर परिसरात तैनात सैनिकांना राख्या बांधण्यात आल्या. पुणे शहरातील महिला, विद्यार्थीनी, सामाजिक संस्थांकडून संकलित केलेल्या सात ते आठ हजार राख्या सैनिकांपर्यंत पोहोचविण्यात आल्या. या उपक्रमाला श्री पांडुरंग आदर्श सेवा ट्रस्टचे अध्यक्ष सूरज परदेशी, ‘आम्ही पुणेकर’ संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव, सागर बोदगिरे , ‘आम्ही मावळे प्रतिष्ठान’चे अध्यक्ष नरेंद्र डोईफोडे; तसेच सीमेवरील अधिकारी आणि सैनिक, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.