राहुल यांच्या मनुस्मृतीवरील वक्तव्याविरोधात तक्रार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
complaint filed against rahul gandhis statements on manusmriti
‘छात्रों की गूँज’ या कार्यक्रमादरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मनुस्मृतीबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या वकील नाझिया खान यांनी तक्रार दाखल केली आहे. राहुल गांधी यांनी प्राचीन ग्रंथातील ठरावीक भाग निवडून आणि शब्दांचा विपर्यास करून या ग्रंथाची बदनामी केल्याचा आरोप नाझिया खान यांनी केला आहे.

खान म्हणाल्या, ‘मी खान असले तरीही मी कलमा आणि शहादा दोन्हीचे पठण करते; तसेच जेव्हा मी ‘वंदे मातरम’ म्हणते तेव्हा मला स्वतःचा अभिमान वाटतो. एका विशिष्ट अध्यायातील शब्दांची मोडतोड करून चुकीचा समज पसरवण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांच्याकडून केला गेला आहे.’
प्रत्येकाला भाषणस्वातंत्र्य आणि मूलभूत अधिकार असल्याचे मान्य करून खान यांनी राहुल गांधी यांच्या मंचावरील पार्श्वभूमीवर प्रश्न उपस्थित केला. भाषणादरम्यान पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची छायाचित्रे का लावण्यात आली होती, असा प्रश्न त्यांनी विचारला. ‘भाजप सरकार सत्तेत आल्यापासून सर्वांनी मनुस्मृती वाचलीच पाहिजे किंवा तिचे पालन केलेच पाहिजे, असे विधान पंतप्रधानांनी कधी केले आहे का,’ असा प्रश्न विचारून ‘राहुल गांधींना याचे उत्तर द्यावे लागेल,’ असे त्या म्हणाल्या.