सोनिया यांच्या पुस्तक प्रकाशनावरून वाद

महाराष्ट्र टाइम्स
सोनिया यांच्या पुस्तक प्रकाशनावरून वाद
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
‘पेंग्विन इंडिया’ या प्रकल्पातून बाहेर पडल्यानंतर आता अनेक भारतीय प्रकाशक या पुस्तकाच्या प्रकाशन अधिकारांसाठी इच्छुक असल्याचे समोर आले आहे. त्यात हार्परकॉलिन्स इंडिया आघाडीवर असून, पुस्तकाचे भारतातील प्रकाशन आणि वितरण याबाबतचा करार अंतिम टप्प्यात असल्याचे वृत्त आहे. मात्र, करारावर अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब झाल्याची घोषणा झालेली नाही.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या ‘बिलाँगिंग : ए जर्नी ऑफ लव्ह’ या बहुप्रतीक्षित आत्मचरित्राच्या भारतातील प्रकाशनावरून वाद निर्माण झाला आहे. ‘ पेंग्विन रँडम हाउस इंडिया ’ हे पुस्तक भारतात प्रकाशित करणार नसल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामागे दबाव असल्याचा आरोप काँग्रेसने केला.
सोनिया गांधी यांच्या या सुमारे ५४४ पानांच्या आत्मचरित्राचे आंतरराष्ट्रीय प्रकाशन दहा नोव्हेंबर रोजी अपेक्षित आहे. मात्र, ‘या पुस्तकाचे भारतातील प्रकाशक आपण नाही,’ असे ‘पेंग्विन रँडम हाउस इंडिया’ने स्पष्ट केले आहे. त्यामागे दबाव आहे का, याचे स्पष्ट उत्तर न देता ‘पेंग्विन’ने पुस्तकाच्या हस्तलिखितातील संपादकीय बदल आणि काही भाग वगळण्यावरून लेखक व प्रकाशक यांच्यात मतभेद झाल्याचे वृत्त फेटाळले आहे. आता हार्परकॉलिन्स प्रकाशन भारतातील प्रकाशनाधिकार मिळविण्याची शक्यता आहे.

‘सोनिया गांधी यांनी संपादकीय सूचना किंवा बदल स्वीकारले नाहीत म्हणूनच पुस्तक प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हणणे योग्य नाही. प्रकाशक म्हणून तथ्य पडताळणी करणे आणि पुस्तकाच्या हितासाठी लेखकाला सूचना देणे हा प्रकाशकाचा अधिकार आणि जबाबदारी आहे,’ असे ‘पेंग्विन रँडम हाउस इंडिया’ने स्पष्ट केले आहे. गांधी यांच्यासोबत याबाबत झालेल्या गोपनीय चर्चांचा तपशील सार्वजनिक केला जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले.

या आत्मचरित्रात सोनिया गांधी यांनी युद्धोत्तर इटलीतील बालपणापासून भारतात येण्यापर्यंतचा प्रवास मांडला आहे. राजीव गांधी यांच्याशी झालेली भेट, विवाह आणि नेहरू-गांधी कुटुंबातील अनुभव यांचा पुस्तकात समावेश आहे. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्येनंतर त्यांच्या आयुष्यात झालेले बदल, सार्वजनिक जीवनातील प्रवेश; तसेच २००४ मध्ये काँग्रेसप्रणीत यूपीए सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधानपद स्वीकारण्यास त्यांनी दिलेला नकार याबाबतही आत्मचरित्रात भाष्य करण्यात आले आहे. देशात गेल्या सहा दशकांत झालेल्या व आपण अनुभवलेल्या सामाजिक आणि राजकीय बदलांकडेही या पुस्तकातून पाहण्याचा प्रयत्न सोनिया गांधी यांनी केला आहे.