Gatha Suryavanshi Moves To Finals With Historic Victory
गाथा सूर्यवंशीची उपांत्य फेरीत धडक
महाराष्ट्र टाइम्स•
मुलांच्या एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत द्वितीय मानांकित जगशेरसिंग खांगुर्राने अर्जुन रेड्डीवर २१-११, २१-१४ अशी मात केली. जगशेरची आता निश्चल चंदशी लढत होईल. निश्चलने शौर्य अग्रवालवर २२-२०, १५-२१, २१-१२ अशी मात केली. दुसरी उपांत्य लढत अव्वल मानांकित देव रुपारेलिया आणि प्रणव मंजुनाथ यांच्यात होणार आहे. देवने वीरेन सेठवर २१-१७, २१-१५ अशी, तर सातव्या मानांकित प्रणव मंजुनाथने लक्ष्मीस्वेतान तामातामालावर २१-१४, २१-१७ अशी मात केली.
महाराष्ट्राच्या गाथा सूर्यवंशीने शुक्रवारी सुशांत चिपलकट्टी स्मृती महापौर चषक आंतरराष्ट्रीय ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेतील मुलींच्या एकेरीतून उपांत्य फेरी गाठली.शिवाजीनगर येथील पी. ई. सोसायटीच्या मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा सुरू आहे. मुलींच्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत रायगडच्या गाथाने भारताच्याच अवनी गोविंदला २१-१४, २१-१६ असे पराभूत केले. ही लढत ३४ मिनिटे चालली. पहिल्या गेममध्ये सुरुवातीला चुरस पाहायला मिळाली. अवनीकडे ९-७ अशी आघाडी होती. त्या वेळी गाथाने सलग सहा पॉइंट जिंकले आणि आघाडी घेतली. त्यानंतर अखेरपर्यंत आघाडी न गमावता गाथाने पहिल्या गेममध्ये बाजी मारली.
आव्हान राखण्यासाठी अवनीला दुसरी गेम जिंकणे गरजेचे होते. या गेममध्येही सुरुवातीला चुरस पाहायला मिळाली. मात्र, अवनीला एकदाही आघाडी मिळवता आली नाही. ८-७ अशी निसटती आघाडी असताना गाथाने पुन्हा एकदा सलग सहा पॉइंट जिंकले. त्यानंतर, अवनीने प्रतिकार केला. मात्र, आघाडी न गमावता गाथाने विजयावर शिक्कामोर्तब केले. गाथाची आता थायलंडच्या पात्तानून तिनापारपोर्नचोकशी लढत होईल. पात्तानूनने विजयालक्ष्मी बोड्डूला २१-१७, २१-१७ असे पराभूत केले.
रिशिका-ईशिता लढत
दुसरी उपांत्य लढत रिशिका नंदी आणि ईशिता नेगी यांच्यात होणार आहे. बिगरमानांकित रिशिकाने तिसऱ्या मानांकित दिशा संतोषला २१-१६, २१-१८ असा धक्का दिला, तर द्वितीय मानांकित दिशिता सिंघा गोपीनाथवर २२-२०, २१-१४ असा विजय मिळवला.
उपांत्यपूर्व फेरीचे निकाल : मिश्र दुहेरी : जगजितसिंह-एंजल पुणेरा वि. वि. यदुनंदन केनचैया-कृत्या शिवशंकर २१-१५, २१-१५; महंमद झिलाझिक आर्तांदो झकारिया-अफिझा रहमधानी वि. वि. वंश देव-आन्या बिश्त २४-२२, २१-१४; पुनीत सुरेश-अदिती दीपकराज वि. वि. ओजस जोशी-तन्वी घारपुरे २१-१७, २१-१४; हरीश राघवेंदीरन वैतियानाथन-जननिका रमेश वि. वि. आर्यन बिराजदार-सोयरा शेलार १७-२१, २१-१४, २१-१८.
मुलींचे दुहेरी : जननिका रमेश-शरयू सूर्यानेनी वि. वि. लक्ष्या राजेश-कृत्या शिवशंकर २५-२३, २१-१७; चांतारात मर्नदाकूल- पिअरप्लोय सुत्तीवारायानन वि. वि. दीपिका-अक्षिता २१-१७, २१-१९.