डी या शब्दातच किती पदर असतात. भावनेचा, आनंदाचा, आठवणींचा, मायेचा एक एक धागा... त्या फाटल्या किंवा नेसण्यायोग्य राहिल्या नाहीत, तर जीव तुटतोही... साड्यांवरचं प्रेम काळ बदलला, तरी कायम आहे. त्या भोवतालच्या कथांची वीण घट्टच आहे. उलट आता कपड्यांचे कितीतरी सुटसुटीत पर्याय उपलब्ध असले, तरी साडी मागे सरलेली नाही. उलट तिचं वलय विस्तारतंय. अगदी आताच्या कॉर्पोरेट जगतातही तिला मानाचं स्थान आहे.
आताशा काही जणी साडी नको गं बाई म्हणत असल्या, तरी बहुसंख्य महिला, विशेषत: तरुणींनी साड्यांना आपलंस केलंय. अगदी लग्नसमारंभ किंवा तत्सम सोहळ्यासाठी नव्हे, तर ऑफिसपासून पार्टीपर्यंत सगळ्यांत साड्यांचा भाव काही कमी होत नाही. भारतात प्रत्येक राज्याच्या साडीची नजाकत वेगळी आहे. या प्रत्येक साड्यांच्या प्रकाराचं अर्थकारण वेगळं. पण साड्यांची एकूणच बाजारपेठ रुंदावत आहे.आकडेच सांगायचे झाले तर, आयएमएआरसी या जागतिक व्यवस्थापन संस्थेने आपल्या वेबसाइटवर दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील साडी बाजाराचे मूल्य सन २०२५मध्ये ६.१५ अब्ज डॉलर इतके होते आणि २०२६ ते २०३४ या काळात ते १०.७७ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. या सगळ्यात प्रीमियम, हातमागावरील आणि डिझायनर साड्यांच्या बाजारपेठेत मोठी तेजी आहे. यामागील कारणांची शृंखला मोठी आहे. पण सोशल मीडिया हे त्यापैकी एक प्रमुख कारण आहे. #SareeLove, #100SareePact असे ट्रेंड्स तरुणींना साडी परिधान करण्यासाठी आकृष्ट करतात. शिवाय साडी नेसून रील्स करण्याचा कलही आहे. साडीबरोबरची फ्युजन फॅशनही जोमात आहे. जॅकेट, क्रॉप टॉप, जीन्ससोबत साडी कूल पर्याय समजला नाही. जिथे स्क्रीनवर दिसण्यासाठी साडीचा वापर केला जातो, तिथे तीच तीच साडी नेसून चालत नाही. मग प्रत्येक वेळी वेगळी साडी या मानसिकतेतून अधिकाधिक साड्या खरेदी केल्या जातात.
सुती, हातमागावरील साड्यांचा कल वाढत आहे. जॉर्जेट साड्यांनाही पसंती मिळते. पण ९० टक्के सुती साड्या आणि १० टक्के जॉर्जेट असे सध्याचे किमान मुंबईचे गणित आहे. मार्केटिंगची गणितं साड्यांच्या प्रकारानुसार बदलतात. पण आजकाल एक कल वाढताना दिसतोय, तो म्हणजे ‘डायरेक्ट टू कस्टमर’ अर्थात ‘डीटूडी’. महिलांना वैविध्य हवं असतं. आपली साडी सगळ्यांत उठून दिसावी, ती वेगळी असावी, ती केवळ आपल्याकडेच असावी, ही मानसिकता दृढ होत आहे. त्यातून आपल्या मनासारख्या साड्या तयार करून घेण्याचं प्रमाण वाढत आहे. त्यासाठी ऑनलाइन साडी विक्रेते किंवा थेट विणकर यांच्याकडून साड्या डिझाइन करून घेतल्या जातात. या प्रक्रियेत किरकोळ विक्रेत्यांनाही एकाच पद्धतीच्या खूप साड्या घेण्याची अट राहत नाही आणि ग्राहकही समाधानी राहतात. घाऊक विक्रेत्यांकडून साड्या घेतल्या तर त्या खूप प्रमाणात घ्याव्या लागतात. कारागीरांकडून थेट साड्या आपल्या प्रमाणात घेता येतात. या थेट साखळीत मार्केटमधला कल कारागीरांकडून लागलीच कळतो. काही विक्रेते कारागीरांना उत्पादनासाठी पायाभूत सुविधा पुरवतात, तर काही जण आधीपासून उत्पादन करणाऱ्या कारागीरांकडे मागणी नोंदवतात. आजकाल महिला फोटो देतात. तो बहुतांश वेळा नवऱ्यासोबतचा असतो. तशा पद्धतीचे वीणकाम साडीच्या पदरावर केले जाते. सोने, चांदीची जर असलेली साडी तयार करून घेण्याचाही कल असतो, असे चेंबूर येथील साडीविक्रेत्या अंकिता केळकर सांगतात. ‘मी राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात येथून साड्या मागवते. माझ्या १०० टक्के साड्या विकल्या जातात. दहा वर्षांपासून मी या व्यवसायात आहे. साडी घेण्याची मागणी वाढतच आहे. ऑनलाइनपासून सुरू झालेला माझा प्रवास दुकानापर्यंत स्थिरावला. काही जणी तर सहजच नवीन काय आलं आहे, या कुतूहलातूनही साडी खरेदी करतात,’ असं निरीक्षणही त्या नोंदवतात.
ज्या घरांत वीणकामाचा वारसा आहे, त्या घरांतील तरुण मंडळी वडिलांच्या व्यवसायाचे ब्रँडिंग करतात. इन्स्टाग्रामवरून विक्री करतात आणि थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतात. ही संख्या मोठी आहे. थेट विणकरांकडून ग्राहकाकडे म्हणजे ‘डब्ल्यूटूसी’ हे प्रमाणही अतिशय वेगाने वाढत आहे. मध्यस्थांची साखळी मोडीत निघत आहे.
ई-कॉमर्स आणि सोशल मीडिया, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम आणि डिजिटल पेमेंटमुळे विणकर थेट ग्राहकांशी जोडले गेले आहेत. शिवाय शहरांमध्ये भरणारी ‘हँडलूम एक्स्पो’ किंवा ‘क्राफ्ट बाजार’ यामुळे ग्राहकांना थेट विणकरांकडून खरेदी करण्याची संधी मिळते, असं सोलापूर क्लस्टरच्या सरकारनियुक्त टेक्स्टाइल डिझायनर सीमा माळी सांगतात. जे विणकर थेट ब्रँड, डिझायनर किंवा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मशी जोडले गेले आहेत, त्यांच्या उत्पन्नात ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे. जीआय टॅग मिळालेल्या उत्पादनांमुळे (उदा. पैठणी, चंदेरी, कांजीवरम) विणकरांना त्यांच्या कौशल्याचा योग्य मोबदला मिळतो, असे निरीक्षणही त्यांनी मांडलं.
महाराष्ट्राची ओळख असलेल्या पैठणीत आजकाल सुती कापडातील पैठणीला मागणी आहे. माहेश्वरीतील पैठणीही पसंतीस उतरत आहे. पैठणी खरं तर चार हजार रुपयांपासून अगदी लाखांपर्यंत असतात. आम्ही महागात महाग ११ लाखांची पैठणी तयार केली आहे. उच्च दर्जाची, आपल्या पसंतीने डिझाइन केलेली साडी घेण्याकडे ग्राहकांचा कल असतो. त्यामुळे आम्ही प्रशिक्षण देऊन विणकर तयार करतो. मोठमोठे उद्योजक आता या व्यवसायात उतरले आहे. अंबानी समूहाचाही पैठणीचा ब्रँड आहे. हे सगळे मोठे उद्योजक आमच्याकडूनच पैठणी तयार करून घेतात. यातून १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल झाली आहे. मात्र मागणी वाढली; त्या तुलनेत कारागिरांची संख्या अपुरी पडते, अशी स्थिती आहे, असे ‘कापसे पैठणी’चे बाळकृष्ण कापसे सांगतात.
सुती, चंदेरी साड्यांची मागणी ३० टक्क्यांनी वाढली आहे. ग्राहकांना हवी तशी साडी आम्ही तयार करून देतो. थेट किरकोळ विक्रेते किंवा ग्राहक अशी साखळी मजबूत होत आहे, असे निरीक्षण राजस्थानच्या बगरू येथील यश छिपा यांनी मांडले. सुती साड्यांचा वाटा सन २०२५मध्ये सुमारे २३ टक्के होता. वर्षागणिक तो वाढत आहे. मात्र, या क्षेत्राला मर्यादा आहेत. यातील सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे विणकरांची संख्या. तुटपुंजे वेतन आणि अनिश्चितता यामुळे या क्षेत्रात तरुण मंडळी येताना दिसत नाहीत. जुणेजाणते विणकर सध्या हे काम करत आहेत. पण त्यांचे वाढते वय हा चिंतेचा विषय आहे. चौथ्या अखिल भारत हातमाग गणनेनुसार हातमागाच्या कामात देशभरात ३१.४५ लाख कुटुंबे गुंतलेली आहेत. यामधील १८ लाख कुटुंबे ही चार राज्यांतील आहेत.