Sleeper Bus Accident On Bridge Five Dead And Twelve Injured
बस अपघातात पाच ठार, १२ जखमी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
राजगड : मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भरधाव स्लीपर बसची पुलाच्या संरक्षक भिंतीला धडक बसली. या अपघातात पाच जण ठार झाले असून, १२ जण जखमी झाले आहेत. हा अपघात सकाळी सातच्या सुमारास बियावरा येथील बायपासच्या पुलावर झाला. बस उत्तर प्रदेशातील कानपूरहून इंदूरकडे जात होती. पुलावरील वळण घेताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ती संरक्षक भिंतीवर जाऊन आदळली. गंभीर जखमींना उपचारासाठी भोपाळला हलवण्यात आले आहे. मृतात एका पोलिस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.
भटक्या कुत्र्याला गोळ्या घातल्याबेंगळुरू : कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात भटका कुत्रा पाळीव कुत्र्यांपैकी एका कुत्र्याला चावल्याने संतप्त झालेल्या एका व्यक्तीने त्या भटक्या कुत्र्याला गोळ्या घालून ठार केले. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लिंगमूर्ती (रा. नडवल्ली) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीकडे पिस्तूल कोठून आली याचा पोलिस तपास करीत आहेत.
डीपफेक व्हिडिओ पोस्टप्रकरणी दोघांवर गुन्हा
हैदराबाद : काँग्रेसचे वरिष्ठ नेते सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वद्रा यांना लक्ष्य करणारे अश्लील ‘डीपफेक’ व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेने ‘एक्स’वरील दोन खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तेलंगणातील काँग्रेसचे आमदार व्यंकट बालमूर यांनी तक्रार दाखल केली होती.
बारामुल्लात दोन ग्रेनेड सापडले
श्रीनगर/जम्मू : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात दोन हँड ग्रेनेड्स जप्त करण्यात आले आहेत, तर राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळील ड्रोन घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडल्याचे सुरक्षा दलांनी सांगितले. उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील कुंजर भागातील ‘वुसान बांगिल’ येथे वाहन तपासणीदरम्यान एका व्यक्तीकडून दोन हँड ग्रेनेड्स जप्त केले.
पंजाबमध्ये अ ॅनालॉग पनीरवर बंदी
चंडीगड : सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी पंजाब सरकारने ‘ॲनालॉग पनीर’च्या उत्पादन, वितरण आणि साठवणुकीवर संपूर्ण राज्यात बारा महिन्यांची कडक बंदी घातली आहे. पंजाबच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त कंवलप्रीत ब्रार यांनी या संदर्भात आदेश दिले.
झारखंडच्या डीजीपींना हायकोर्टाची नोटीस
रांची : राज्यभरातील पोलिस ठाण्यांमध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसवण्याच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल झारखंड उच्च न्यायालयाने पोलिस महासंचालक (डीजीपी) तडाशा मिश्रा यांना न्यायालयाच्या अवमानाची नोटीस बजावली आहे. मुख्य न्यायमूर्ती एम. एस. सोनाक आणि न्यायमूर्ती राजेश शंकर यांच्या खंडपीठाने गुरुवारी एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुख्य सचिव अविनाशकुमार आणि गृह सचिव वंदना दादेल यांना उच्च न्यायालयाचे आदेश गांभीर्याने घेण्यास सांगितले.
पॅलेस्टिनी ध्वज फडकावल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा
शिवमोग्गा : कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यातील ‘आरएमएल’नगरमध्ये २४ ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद उत्सवासाठी उभारण्यात येत असलेल्या कटआउटवर पॅलेस्टिनी ध्वज फडकवल्याच्या आरोपावरून पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. निहाल ऊर्फ बेक्कू, उमर आणि अब्रहार अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी कटआउटवर चढून ध्वज दाखवला व त्याचे रेकॉर्डिंग केल्याचा आरोप आहे.
तीन नवीन ‘एनआयए’ विशेष न्यायालये
नवी दिल्ली : दहशतवादविरोधी प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी केंद्र सरकारने आंध्र प्रदेश, राजस्थान आणि बिहारमध्ये तीन नवीन ‘एनआयए’ विशेष न्यायालये स्थापन केली आहेत. संबंधित उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तींशी सल्लामसलत करून जयपूर, पाटणा आणि विशाखापट्टणम येथील विशेष न्यायालयांना ‘एनआयए’ न्यायालयाचा दर्जा देण्यात आला आहे.