राज्यातील ६६ जणांशी अद्याप संपर्क नाहीच

महाराष्ट्र टाइम्स
66 citizens in the state remain unreachable inquiry by administration underway
नेपाळ-तिबेटमध्ये आलेल्या भीषण प्रलयानंतर तेथे अडकलेल्या राज्यातील नागरिकांची संख्या शनिवारी सकाळपर्यंत ४०४ वर कायम असल्याचे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले. त्यापैकी ३३८ जणांशी संपर्क साधून ते सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, ६६ नागरिकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. यामध्ये ‘रिचा टूर्स प्रा. लि.’ या कंपनीमार्फत गेलेल्या ६० नागरिकांचा समावेश असून, या गटाशी अद्याप थेट संपर्क प्रस्थापित झालेला नाही. अन्य सहा नागरिकांची माहिती लिंकद्वारे मिळाली असली तरी त्यांच्याशीही संपर्क साधता आलेला नाही. राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या शनिवारी पत्रकातून ही माहिती दिली.

नेपाळ-तिबेट परिसरात २६ ऑगस्टला मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने अनेक जिल्ह्यांत मोठी हानी झाली. या भागात महाराष्ट्रासह अनेक भारतीय नागरिक अडकले आहेत. महाराष्ट्रातील अडकलेल्या नागरिकांच्या संपर्कासाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने (एसईओसी) माहिती संकलनाची स्वतंत्र यंत्रणा उभी केली असून, जिल्ह्यांच्या माध्यमातून नागरिकांची माहिती पडताळण्याचे काम सुरू आहे. अडकलेल्या ४०४ नागरिकांपैकी ३३८ नागरिकांशी संपर्क साधण्यात प्रशासनाला यश आले आहे. हे सर्व नागरिक सुरक्षित असल्याचे संबंधितांनी कळविले आहे. त्यापैकी नागपूरमधील १०५ नागरिक भारतात परतले आहेत. त्यामुळे संपर्क झालेल्या नागरिकांपैकी काहींची मायदेशी परतण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, ४०४ नागरिकांपैकी ३७ नागरिक सागा (मानसरोवरजवळील परिसर) येथून भारतासाठी रवाना झाले आहेत. मात्र रिचा टूर्सद्वारे गेलेल्या ६० नागरिकांशी अद्याप थेट संपर्क न झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. प्रशासनाकडे या गटाची माहिती उपलब्ध असली तरी त्यांच्याशी थेट संपर्क साधण्यात अद्याप यश आलेले नाही. सध्या एकूण ६६ नागरिकांबाबत संपर्काची स्थिती स्पष्ट झालेली नाही.