‘कांदा एक्स्प्रेस’ चेन्नईकडे रवाना

महाराष्ट्र टाइम्स
‘कांदा एक्स्प्रेस’ चेन्नईकडे रवाना
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
मनमाड स्थानकातून चेन्नईकडे कांदा घेऊन रवाना झालेल्या मालगाडीला २१ डबे (वॅगन) असून, प्रत्येक डब्यात सुमारे ४० टन कांदा भरण्यात आला आहे. अशा प्रकारे एकूण ८०० टन कांदा परराज्यात पाठविण्यात आला. कांदा पाठविला जात असताना कोणताही विरोध झाला नसल्याने रेल्वे प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. लाखो रुपयांचा कांदा नाशिक जिल्ह्यातून देशभरात जात असल्याने यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या कांदा दरावर विपरीत परिणाम होऊन दर खाली येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

एकीकडे कांद्याच्या दरात वाढ होत असताना कांद्याच्या भावावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी करण्यावर भर देण्यात येत आहे. लासलगावपाठोपाठ मनमाड रेल्वे स्थानकातून शुक्रवारी (दि. २८) मध्यरात्री तब्बल ८०० टन कांदा विशेष मालगाडीने चेन्नईकडे रवाना करण्यात आला.
हा कांदा ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’कडून खरेदी करण्यात आलेला बफर स्टॉक आहे. शुक्रवारी दिवसभर या कांद्याचे मालगाडीत लोडिंग करण्यात आले. त्यानंतर शनिवारी चेन्नई रेल्वे विभागातील कोरुक्कुपेट येथे हा कांदा पाठविण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मालगाडीत एकूण २१ डबे शुक्रवारपासूनच ‘एनसीसीएफ’ व ‘नाफेड’ यांच्या विविध गोदामांत साठवलेला कांदा ट्रकमधून मनमाड मालधक्क्यावर आणण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू होते. त्यामुळे अनेक ट्रक शहरात दाखल झाल्याचे चित्र होते. लासलगाव रेल्वे स्थानकावरून दोन दिवसांपूर्वी कांद्याची विशेष मालगाडी दिल्लीकडे रवाना झाल्यानंतर मनमाडहूनही विशेष मालगाडीने चेन्नईकडे कांदा पाठविण्याचे नियोजन केले होते.

यापुढेही जाणार कांदा

विशेष रेल्वेने पाठविण्यात आलेला हा उन्हाळ कांदा असून, या पुढेही मनमाड, लासलगाव व निफाड स्थानकावरून कांदा पाठविण्यासाठी रेल्वे रॅक किंवा विशेष मालगाडीची गरज लागू शकते, असे कांदा पाठविणाऱ्या संबंधित वेअर हाऊसच्या अधिकाऱ्यांनी सूतोवाच केल्याचे सूत्रांनी सांगितले.