Ek Vati Food Quality Inspection Anganwadi Workers Demand
‘एका वाटी’ची तपासणी
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
‘पोषण आहार पोषक कधी होणार?’ असा प्रश्न अंगणवाडी सेविका सातत्याने उपस्थित करतात. मात्र त्यांना यासंदर्भात सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची माहिती पोस्ट न करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ‘लाभार्थी जर हा आहार घेत नसतील आणि याबद्दल वारंवार तक्रार करूनही आहाराची गुणवत्ता सुधारत नसेल तर त्याची दखल का घेतली जात नाही’, अशी खंत अंगणवाडीसेविकांनी व्यक्त केली आहे. जो आहार लहान मुले आणि गर्भवती मातांना दिला जातो त्याची गुणवत्ता अधिक चांगली राहील हे पाहणे सरकारची जबाबदारी नाही का? असा आहार घरी तरी खाऊ का?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
राज्यातील अंगणवाड्यांमध्ये बालकांना तसेच गर्भवती, स्तनदा महिलांना देण्यात येणारा आहार सुरक्षित तसेच दर्जेदार आहे की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने दिले आहेत. अंगणवाडीत उपलब्ध झालेल्या आहाराची मागील ४८ तासांत प्रत्यक्ष अंगणवाडीत जाऊन तपासणी करावी, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने राज्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, सर्व मुख्यसेविका तसेच पर्यवेक्षिका यांना यासंदर्भात निर्देश दिले आहे. ‘अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी अंगणवाड्यांमध्ये वितरित होणाऱ्या आहाराचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून हा आहार गुरेही खात नाहीत,’ अशी खंत व्यक्त केली होती. ‘एफडीए’ने अंगणवाड्यांमधील आहाराची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार ‘एफडीए’नेही या अंगणवाड्यामधील आहाराचे नमुने गुणवत्ताचाचणीसाठी घेण्याचा निर्णय घेतला.
या पार्श्वभूमीवर, सर्व अंगणवाडीतील लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहाराची प्रत्यक्ष अंगणवाडीमध्ये जाऊन तपासणी करावी, असे निर्देश एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने दिले आहेत. आहाराची प्रत्यक्ष तपासणी करावी तसेच त्यांची गुणवत्ता काय आहे याची माहिती घ्यावी, असेही स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
केवळ अंगणवाडी स्तरावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तपासणी करणे अपेक्षित नसून महिला बालविकास विभागाचे विभागीय उपायुक्त आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनीदेखील त्यांच्या अधिनस्त प्रकल्पातील काही अंगणवाड्यांना स्वतः प्रत्यक्ष भेट द्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
संबधित अधिकाऱ्यावर जबाबदारी
‘एफडीए’ने आहाराच्या गुणत्तेसाठी अचानक तपासणी केल्यास, त्यासाठी एक वाटी आहार वेगळा काढून ठेवावा. आहाराच्या तपासणीदरम्यान त्रुटी आढळल्यास संबधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.