Nationalist Congress Party Discusses New Changes Sharad Pawar Absent
राष्ट्रवादी ‘शप’ पुन्हा भाकरी फिरविणार
महाराष्ट्र टाइम्स•
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मध्यवर्ती समितीची विशेष बैठक शनिवारी मुंबईत पार पडली असून या बैठकीत पक्षात अनेक अंतर्गत बदल करण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात प्रामुख्याने पक्षासाठी नेमण्यात आलेल्या मध्यवर्ती समितीमध्ये नव्या सदस्यांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. याशिवाय पक्षाच्या युवक, विद्यार्थी संघटनेमध्येही अनेक बदल करण्यावर शनिवारी शिक्कामोर्तब झाल्याचे कळते. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने जिल्हानिहाय निरीक्षक नेमण्यात येणार असल्याची माहितीही एका मोठ्या नेत्याने दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या या समितीची बैठक मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, मााजी मंत्री जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. या बैठकीत हे निर्णय झाल्याची माहिती पक्षाचे आव्हाड यांनी दिली. राज्य आणि देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकरी कर्जमाफी, स्मार्ट मीटर, रस्त्यांची दुरवस्था यांसह विविध प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. तसेच राष्ट्रवादीच्या एकीकरणाचा कोणताही मुद्दा चर्चेत नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.केंद्रातील एनडीए सरकारमध्ये सहभागी होण्याबाबतही बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही सांगण्यात आले. शरद पवार यांच्यासमोर या चर्चा होऊ नयेत यासाठीच ते उपस्थित नसल्याचे या बैठकीपूर्वी बोलले जात होते.
नीट पेपरफुटीनंतर आंदोलन करणाऱ्या अनेक युवा वर्गांवर गुन्हे दाखल करण्याबरोबरच इतर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना कायदेशीर मदत करण्याच्या दृष्टिकोनातून पक्षाने महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली. पक्षाने या तरुणांसाठी विधिविषयक साह्य देण्यासाठी चमू तयार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. त्याशिवाय पक्षाचे प्रवक्ते बदलण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.
‘वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, कर्जमाफीवर नाराज असणारे शेतकरी, लाडकी बहीण योजनेतून कोट्यवधी बहिणींना वगळणे, स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना पाठबळ आणि आर्थिक पिळवणुकीमुळे त्रस्त नागरिक या गंभीर प्रश्नांवर या बैठकीत चर्चा झाली. एमपीएसस्सीमध्ये झालेल्या गोंधळाबाबत सरकार गंभीर नसल्याने एमपीएससीविरोधात आंदोलन उभे करावे लागेल यावरही चर्चा झाली’, असे आव्हाड यांनी सांगितले.