‘जालन्यात एका दलित तरुणावर बैलविक्रीचा आरोप करत मारहाण करणे, जातिवाचक शिवीगाळ करणे आणि त्याला शेण खायला भाग पाडल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे, त्याच्या ११ वर्षांच्या मुलालाही अशीच अमानुष वागणूक देण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. हा प्रकार महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारा आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की गुंडांचे, या गुंडांना अद्दल घडवावी तसेच जालन्यातील प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा’, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी शनिवारी केली.
‘भाजप सरकारच्या काळात दलितांवरील अन्याय-अत्याचार वाढले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सभा घेतलेल्या जागेचे शुद्धीकरण केल्याचे जाहीरपणे समर्थनही केले जाते. परंतु भाजपाकडून त्यावर मौन पाळले जाते. ही मनुवादी विकृती देशभर फोफावत चालली आहे, असे त्या म्हणाल्या.