आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत कालबद्ध कार्यक्रम

महाराष्ट्र टाइम्स
आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत कालबद्ध कार्यक्रम
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
‘आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. अनुदानित तसेच शासकीय आश्रमशाळा येथील गैरसोयीबाबत त्रयस्थांतर्फे परीक्षण करून कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. आता आंदोलक विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घ्यावे व अभ्यास सुरू करावा’, असे आवाहन आदिवासी विकासमंत्री अशोक वुईके यांनी केले.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी वर्षा या निवासस्थानी बैठक पार पडली. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा करत, त्यांच्या पूर्ततेसाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.
‘बहुतांश मागण्या मान्य’

या बैठकीनंतर वुईके यांनी माध्यमांना माहिती दिली. ‘मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थी शिष्टमंडळांचे सर्व प्रश्न ऐकून घेतले त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या. विदयार्थ्यांच्या शिष्टमंडळात पुणे,नागपूर येथील विद्यार्थी होते. मी पुणे येथे जाऊन उपोषण मागे घेण्याची विनंती आता करणार आहे. छोटा संवर्ग २०१७च्या शासन निर्णयानुसार येत्या काळात अनुसूचित जमातीचा बिंदू नामावलीत दुसरा क्रमांक असावा याबाबत समिती स्थापन करण्यात आली आहे. तीन महिन्यांत समिती ज्या शिफारशी देईल, त्यानुसार कारवाई करण्यात येईल’, असे त्यांनी सांगितले.