Horrific Accident At Rahud Ghat Container Collides With Five Vehicles
कंटेनरची पाच वाहनांना धडक
महाराष्ट्र टाइम्स•
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
वारंवार अपघातांमुळे कुप्रसिद्ध ठरलेला मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील राहुड घाट शुक्रवारी (दि. २८) रात्री पुन्हा चर्चेत आला. उतारावर ब्रेक फेल झालेल्या टायरने भरलेल्या कंटेनरने लक्झरी बस, पोलिस व्हॅन, कार आणि पिकअपसह पाच वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात कंटेनरमधील हेल्परचा मृत्यू झाला, तर सात ते आठ जण जखमी झाले. सततच्या अपघातांनंतरही कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आरजे ३६ जीए ८६१२ क्रमांकाचा टायरने भरलेला कंटेनर मुंबईकडून मालेगावच्या दिशेने जात होता. राहुड घाटातील उतारावर कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कंटेनरने प्रथम एमपी ०९ एजे ६८७७ क्रमांकाच्या लक्झरी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. या बसमध्ये सुमारे ३० प्रवासी होते.ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आल्यानंतर कंटेनरमधील हेल्परने उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर कंटेनरने इंदूरहून नाशिककडे जाणाऱ्या पोलिस व्हॅनला, तसेच एमएच ४१ बीआर ४२२५ क्रमांकाच्या क्रेटा कारला धडक दिली. कारमधील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. एका पिकअप वाहनालाही धडक बसल्याचे समजते.
अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका, पोलिस व टोल कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना चांदवड व मालेगाव येथील रुग्णालयांत दाखल करण्यात आले.
राहुड घाटात वारंवार अपघात होत असूनही कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना का होत नाहीत, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. धोकादायक वळणे, तीव्र उतार आणि अवजड वाहनांची वर्दळ लक्षात घेता तज्ज्ञांकडून तातडीने पाहणी करून सुरक्षा उपाययोजना कराव्यात, दिशादर्शक फलक लावावेत, प्रकाशव्यवस्था सुधारावी आणि प्रभावी वाहतूक नियंत्रण करावे, अशी मागणी होत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.