‘मराठी सक्ती’विरोधातील याचिका निकाली

महाराष्ट्र टाइम्स
‘मराठी सक्ती’विरोधातील याचिका निकाली
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
रिक्षा, टॅक्सी व कॅबचालकांना मराठी भाषेची सक्ती करणाऱ्या नियमाला आव्हान देणारी चार कॅबचालकांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी निकाली काढली. मराठी भाषा शिकण्यासाठी देण्यात आलेल्या मुदतीत आणखी एक वर्षाची वाढ देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्य सरकारतर्फे देण्यात आल्यानंतर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने याचिका निकाली काढत असल्याचे स्पष्ट केले.

एका शिष्टमंडळाने याप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी भेट घेतल्यानंतर त्यांनी मराठी भाषा शिकण्यासाठीची मुदत एक वर्षाने वाढवण्याची घोषणा केली होती. त्यामुळे मराठी न बोलणाऱ्या चालकांवर तातडीने कारवाई होणार नसून, त्यांना भाषा शिकण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाला आहे. राज्याच्या परिवहन विभागाने १२ ऑगस्ट रोजी अधिसूचना प्रसिद्ध करून बॅज निलंबन व परवाने रद्द करण्याची तरतूद जाहीर केली. त्याअनुषंगाने चालकांना नोटिसा देणे सुरू केले होते. त्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारची ही अधिसूचना चालकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारी असल्याचे म्हणत चार कॅबचालकांनी ॲड. विवेक शुक्ला यांच्यामार्फत ही याचिका केली होती.