रद ऋतुचा प्रारंभ, श्रावणमासाचा मध्यान्ह, मान्सूनचे आगमन आणि मनमोहक फुलांचा बहर अशा उत्साहित वातावरणात ‘तीज’ महोत्सव सुरू होतो. तमाम महिला आणि कुमारिकांसाठी विशेषतः हिंदी भाषिक पट्ट्यांमध्ये प्रसिद्ध असलेल्या या उत्सवाचा मुहूर्त ३१ ऑगस्ट रोजी आहे. ‘रंगीलो सावन आयो रे सुरंगो सावन, बरखा की बूंदा लायो रे हठीलो सावन, आयो आयो तीज त्यौहार रमझम आंगणिये... अशा शब्दांत पारंपरिक ‘तीज’ गीत प्रसिद्ध आहे.
‘तीज’च्या दिवशी केले जाणारे व्रत हे सर्वांत पुण्यदायी आहे. साक्षात भगवान शंकरानेच पार्वतीला या व्रताची महती सांगताना नक्षत्र, ग्रह आणि नद्यांमध्ये चंद्र, सूर्य आणि गंगेप्रमाणेच हे व्रत श्रेष्ठ असल्याचे सांगितले आहे. अखंड सौभाग्यवती राहो, निसर्गसंपन्न असो, जीवनात सुख आणि समृद्धी लाभो अशी मनोकामना करीत महिला निर्जल उपवास करून हे व्रत करतात. या दिवशी सातूच्या पिठाची महादेवाच्या पिंडीची प्रतिकृती तयार करून तिचे विधिवत पूजन करतात आणि सायंकाळी चंद्राला भोग चढवून व्रताची सांगता करतात. याच व्रताला लिंबडी मातेचे व्रत असेही संबोधतात. त्या पूजेत कडुलिंबाच्या डहाळीचे पूजन होते. व्रताची सांगता झाल्यावर महिलांच्या उत्सवाला धार चढते. पारंपरिक पोषाख, साज-श्रृंगार करून महिलांचे खेळ रंगतात. अजूनही राजस्थात महिला आपल्या पतीकडे म्हणजे पियाजीकडे ‘मला झोका बांधून द्या ना; मला झोका खेळायचाय’ असा प्रेमळपणे आग्रह धरतात आणि पियाजी हा आग्रह तितक्याच उत्साहाने पूर्ण करतात. पती-पत्नीच्या या प्रेमळ देवाणघेवाणीवर तितक्याच प्रेमाने केलेल्या काव्य रचनेत म्हणतात, ‘मने झूला घालो जी, पियाजी म्हारो हिवडो हरसावे, बागां में मोर बोले, कोयलडी कूक मचावे, थारे संग झुलू झूला, म्हारो हिवडो हरसावे अशा या ‘तीज’चे स्वप्न प्रत्यक्षात साकारणे यालाच आपले सौभाग्याचे लेणे म्हणतात, असेच मला वाटते.(लेखिका पुण्यातील माहेश्वरी सहेली महिला मंडळाच्या उपाध्यक्ष आहेत.)