सोलापूर : पंढरपुरातील पिराची कुरोली येथील भीमा नदीच्या पात्रात २० फुटी मगरीचे वास्तव्य असल्याचे आढळून आले आहे.ही मगर अधूनमधून पात्रा बाहेर शेतकऱ्यांच्या शेतातही दिसून आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. या मगरीला पकडण्यास वन विभागाला अपयश येत आहे.
चिखलीमध्ये बंद
बुलढाणा : लोणार तालुक्यातील चिखला काकड येथे महापुरुषाच्या पुतळ्याच्या वादातून महिलांना मारहाण केल्याच्या घटनेचा निषेध म्हणून चिखलीमध्ये २३ फेब्रुवारीला कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध सामाजिक संघटना तसेच चिखलीकर नागरिकांनी व्यवहार बंद ठेवले होते. दोषींवर कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा या वेळी देण्यात आला.
बिबट्या मृत्युमुखी
जळगाव : जळगाव जिल्ह्यात रावेर तालुक्यातील मौजे सुदगाव शिवारात तापी नदीच्या काठालगत असलेल्या शेतात एका बिबट्याचा जाळ्यात अडकून मृत्यू झाला. वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपास केला. डुकरांना पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात हा बिबट्या अडकला असावा असा अंदाज आहे.
रेल्वेत सापडले चरस
मुंबई : गाडी क्रमांक १९०३८ गोरखपूर- वांद्रे टर्मिनसमध्ये १३ किलोंहून अधिक चरस सापडले आहे. एक्स्प्रेसची लॉकिंग तपासणी करताना सर्वसामान्य डब्यातील एका बॅगेत चरस होते. या प्रकरणी वांद्रे रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेबीजच्या भीतीने तरुणाची आत्महत्या
कल्याण : कुत्रा चावल्यामुळे आता आपल्याला रेबीज होईल, या भीतीने एका ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना कल्याण पूर्व भागातील तिसगाव नाका येथे घडली. अय्याज हमीद असे या तरुणाचे नाव असून, तो एका खासगी बँकेत नोकरीस होता. कुत्र्यांच्या उपद्रवावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
पिता-पुत्रावर गोळीबार
पालघर : पालघर जिल्ह्यातील बोईसर पूर्वेकडील महागाव परिसरात मंगळवारी रात्री दहा ते अकराच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. यात सुरेश वरखडे (रा. गोवरपाडा स्टॉप, महागाव) आणि त्यांचा मुलगा प्रीतेश वरखडे (वय २६) हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांना पुढील उपचारासाठी वापी (गुजरात) येथे हलवण्यात आले आहे.
अनंत गर्जेला जामीन
मुंबई : पत्नीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात मंत्री पंकजा मुंडे यांचा स्वीय सहायक अनंत गर्जे याला सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश रूपाली पवार यांनी जामीन मंजूर केला.








