‘अनधिकृत होर्डिंग, बॅनर्स, पोस्टर्स चोवीस तासांत काढून घ्या अन्यथा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करू,’ असा इशारा महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिला आहे.
मुकुंदवाडी भागातील अनधिकृत होर्डिंग काढताना शनिवारी महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला, तर अन्य एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. आयुक्त जी.श्रीकांत यांनी अनधिकृत होर्डिंग, पोस्टर, बॅनर लावणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना, जाहिरातदार एजन्सी आणि राजकीय पक्षांना सोमवारी (२३ फेब्रुवारी) इशारा दिला आहे. ज्यांनी अनधिकृत होर्डिंग, बॅनर्स, पोस्टर्स लावले आहेत त्यांनी ते चोवीस तासांत काढून घ्यावेत अन्यथा त्यांच्यावर कायद्यानुसार फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातील असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र मालमत्ता विरुपण प्रतिबंध अधिनियम १९९५चे कलम तीन, महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९चे कलम २४४ व २४५नुसार फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अनधिकृत होर्डिंग किंवा बॅनरमुळे जीवितहानी, अपघात किंवा सार्वजनिक सुरक्षिततेस धोका निर्माण झाल्यास संबंधित व्यक्ती , संस्थांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारादेखील आयुक्तांनी दिला आहे. सर्व संबंधितांनी नियमांचे पालन करून शहराची सुरक्षितता व सौंदर्य राखावे, असे आवाहनदेखील आयुक्तांनी केले आहे.









