राजस्थानमधील टोंक येथे एका ब्लँकेट वाटप कार्यक्रमादरम्यान भाजपचे माजी खासदार सुखबीर सिंह जौनपुरिया यांनी एका मुस्लिम महिलेला तिचा धर्म विचारल्यानंतर दिलेले ब्लँकेट परत घेतल्यावरून वाद निर्माण झाला आहे. ‘धार्मिक भेदभाव हा घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन आहे’, असे म्हणत काँग्रेसने त्यांच्या कृतीचा निषेध केला आहे.
रविवारी दुपारी निवाई तहसीलमधील करेडा गावातील एका मंदिर परिसरात ही घटना घडली. त्यावेळी जौनपुरिया हे २८ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अजमेर दौऱ्यासाठी लोकांना आमंत्रित करण्यासाठी गेले होते. स्थानिकांच्या मते, सुरुवातीला कार्यक्रमात उपस्थित असलेल्या महिलांना ब्लँकेट वाटण्यात आले. परंतु, एका मुस्लिम महिलेकडून ते परत घेण्यात आले. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवीगाळ करणाऱ्यांना ब्लँकेट घेण्याचा अधिकार नाही. हा कार्यक्रम त्यांचा वैयक्तिक उपक्रम होता आणि कोणत्याही सरकारी योजनेशी जोडलेला नाही,’ असे जौनपुरिया या व्हिडीओ क्लिपमध्ये म्हणताना दिसून येत आहेत. अनेक काँग्रेस नेत्यांनी या घटनेचा व्हिडीओ शेअर केला.
दरम्यान, एका युवक काँग्रेस नेत्याने गावात जाऊन मुस्लिम महिलांना ब्लँकेट वाटले आणि भाजपवर विभाजनाचे राजकारण केल्याचा आरोप केला. सोमवारी, गावकरी आणि काँग्रेस कार्यकर्ते एकत्र आले आणि घोषणाबाजी करत निषेध केला. निषेधादरम्यान, जौनापुरिया यांचा पुतळा जाळण्यात आला. टोंकचे आमदार सचिन पायलट यांनी, धर्म आणि जातीवर आधारित भेदभाव केवळ नैतिकदृष्ट्या चुकीचे नाही तर संवैधानिक अधिकारांचे देखील उल्लंघन आहे, असे म्हटले आहे.








