विनोदाच्या आवरणाखालील कारुण्य

Contributed byराजीव जोशी mtedit@timesofindia.com|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

The Marathi stage sees a unique pairing in 'Shankar-Jaykishan'. Veteran actors Mahesh Manjrekar and Bharat Jadhav portray friends, while Jadhav also plays a father to Shivani Rangole. This emotional comedy explores friendship and family bonds. The play's narrative, set against a backdrop of redevelopment, highlights the evolving dynamics between generations. Audiences experience a mix of humor and heartfelt moments.

विनोदाच्या आवरणाखालील कारुण्य

मराठी रंगभूमीवर सहसा दोन मोठ्या अभिनेत्यांची जुगलबंदी पाहायला मिळत नाही. कोणे एके काळी दिग्गज संगीत तसेच गद्य नाटकांत दोन बलाढ्य व्यक्तिरेखांचा सामना बघायला मिळायचा. काही दशकांपूर्वी खेळिया, अप्पा-बाप्पा, कलम-३०२, राहू-केतू, गांठ आहे माझ्याशी यांसारखी काही आशयघन संवादप्रधान नाटके येऊन गेली. त्यामध्ये अरुण सरनाईक, प्रा. मधुकर तोरडमल, मोहन जोशी, दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, रमेश भाटकर अशा लोकप्रिय अभिनेत्यांच्या भूमिका असलेली दर्जेदार नाटके पाहायला मिळाली होती. दोन पुरुष नटांच्या जोड्यांप्रमाणे नाटकांत बाप-कन्या असलेल्या जोडींची मोजकीच नाटके आपल्याकडे सादर झाली. त्यात सुधीर जोशी-सविता प्रभुणे, मोहन जोशी-स्वाती चिटणीस, प्रशांत दामले-तेजस्विनी प्रधान अशा नामवंत अभिनेता-लोकप्रिय अभिनेत्री यांनी साकारलेल्या पिता-पुत्री नात्यातील भावनाविष्कार पाहायला मिळाले होते.

नुकत्याच आलेल्या ‘शंकर-जयकिशन’ या नाटकात या दोन्ही प्रकारच्या जोड्या आढळतात. जीवश्च मित्र म्हणून महेश मांजरेकर-भरत जाधव आणि वडील-मुलगी म्हणून भरत जाधव-शिवानी रांगोळे असा अनोखा त्रिपात्री संयोग भरत जाधव एन्टरटेनमेंटच्या या नाटकाद्वारे साधला गेलाय. विराजस कुलकर्णी व सूरज पारसनीस ही तरुण लेखक-दिग्दर्शकीय जोडी आणि मुरब्बी अभिनेते यांची इमोशनल कॉमेडी गाता-हसवता डोळेही ओले करते. अगदी क्षितिज पटवर्धनच्या गीतातील शब्दांतून सांगायचे तर... माणसे जातात, आठवणी राहतात! हे मैत्री व कुटुंब-सूत्र सांगितले जाते हेच नाटकाचे यश. पडदा उघडताक्षणी दिसून येते घर बदलण्याची, सामान हलवण्याची तयारी - जी आजकाल सर्वच शहरांत रिडेव्हलपमेंटमुळे जोरात चालू आहे. पण प्रस्तुत नाटकात एकाकी पित्याला आपल्या घरी हलवू इच्छिणारी कन्या दिसते. (ही समस्यादेखील बहुतेक घरांत आहे. एकुलता मुलगा-मुलगी आणि त्यांचे आई-वडील) पित्याच्या भूमिकेत भरत जाधव असल्याने घर सोडण्यास नकार देणे हेही तसे विनोदी ढंगातच असणार. तिथूनच बाप-मुलीच्या नात्यातील चकमकी रंगमंचावर झडू लागतात. नेपथ्याबाबतीत कुशल नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी पॅक केलेले खोके, शिवाय बाल्कनी-बेडरूम-किचन अशी स्थळे निर्माण केली आहेत. दिव्याचा खांब, लटकलेली तुटकी पतंग आणि वरून दिसणारी साडी हेही नाट्यास पोषकच. (आपला मराठी विनोद आता साडी-नाडीच्या पुढे गेलाय!)

भरत जाधव-शिवानी रांगोळे यांच्यातील नातेसंबंध प्रस्थापित होत असताना आगंतुक केअरटेकर म्हणून महेश मांजरेकर यांचे आगमन होते आणि तिथूनच शंकर (महादेव) व जयकिशन (श्यामसुंदर) यांच्यातील गान-संवाद जुगलबंदीला व नाटकाला वेग येतो. बॉलिवूडच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे जानेमाने संगीतकार शंकर-जयकिशन या जोडीशी साधर्म्य सांगणारी मित्रांची जोडी, त्यात जुन्या गाण्यांची आवड. म्हणूनच संगीतकार अजित परब-गायक/नट महेश मांजरेकरांचे सूर जुळतात नि प्रेक्षकही नॉस्टॅल्जिक होतात! (बिनाका काळात रमतात!) नव्या पिढीतील विराजस-सूरज यांनाही ‘एस-जे’विषयी प्रेम असल्याने आणि ज्येष्ठांची सृजनसाथ असल्याने गाणी-प्रसंगातून दृकश्राव्य सुमेळ साधला गेलाय.

पहिल्या अंकात ‘हट्टी पिता-निश्चयी कन्या’ यांच्यातील वादावादी म्हणजे हल्ली घराघरात घडणारे प्रसंगच पाहतोय असे वाटते. फरक इतकाच, की ईशाशी फटकून वागणारा महादेव - भरत आपल्या गमत्या ढंगात हसवतो. (उदा- सामानात लपून बसणे, चाव्यांच्या जुडगा देण्यास टाळाटाळ करणे). केअरटेकर अजिबात नको म्हणून आकस्मिक उगवणारा श्यामसुंदर - जुना मित्र असूनही त्याला नाकारण्याचा, बाहेर घालवण्याचा प्रयत्न होतो. शिवानीने पहिल्या अंकात वडिलांच्या बाबतीत दाखवलेली काळजी शब्दांतून जाणवते. काही पुनरुक्ती टाळली तर अंक रेंगाळतो असे वाटणार नाही.

दुसऱ्या अंकात महेश मांजरेकर यांच्या अभिनयाची चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते. अर्थात भरत जाधवही काही कमी नाहीत. भूमिकेच्या चौकटीत राहून चाहत्यांना रिझवण्याचे काम ते करत राहतात. परिणामी दोन अनुभवसिद्ध कलाकारांची संगीत-नृत्य व शाब्दिक झकाझकी प्रेक्षक एन्जॉय करतात. महेश यांचे उमदे गाणे, प्रसन्न वावरणे व अजित परब यांची संगीतसाथ असल्याने विनोदाच्या साथीने सांगीतिक मेजवानी मिळते. एकमेकांना घेतलेले छोट चिमटे, कोपरखळ्या यांतून नात्यातील कंगोरे दिसू लागतात. (अधूनमधून प्रेक्षकांना अपेक्षित असलेला ‘सही’ भरतदेखील अनुभवायला मिळतो.) महेश यांचे हिंदी बोलणे आणि ‘मनसे’ मराठीत बोलण्याला प्रेक्षकांची मनापासून दाद मिळते. एकूणच नाटकाची बांधणी दोन मोहऱ्यांची मैत्री- मज्जा-मस्ती आणि किंचित कौटुंबिक मामला यांतून सजली आणि सोबतीला कारुण्याची झालरही आहे.

दोन मातब्बरांच्या सामन्यात ईशा-शिवानीला पुरेसा वाव मिळेल, याकडे लेखक-दिग्दर्शकाने पाहिले आहे. ईशा म्हणून शिवानीचा रंगमंचावरील वावर नैसर्गिक शैलीतला असल्याने प्रेक्षकांना लोभस वाटतो. शिवाय तिची व्यक्तिरेखा आजच्या करिअरगामी विवाहित कन्येची असल्याने तिचे भावनिक होणे, अस्वस्थता पटणारी व अभिनय-देहबोलीद्वारे अधिक विश्वसनीय वाटते. मात्र पती–कबीरशी होणारा फोन-संवाद माहितीपुरता असल्याने नाट्य घडवण्यास विशेष उपयोग होत नाही. यातील काही जुळवलेल्या बाबी व प्रसंगांची तीस वर्षांपूर्वी ‘मेलोड्रामा’ अशी संभावना झाली असती; पण लेखक-अभिनेता विराजसने आजचे नातेसंबंध-मैत्री यांकडे वेगळ्या परिपेक्ष्यातून पाहिले आहे; दिग्दर्शक सूरज पारसनीस हाही तरुण रंगकर्मी असल्याने दोघांच्या समन्वयातून सादरीकरणात वेगळेपणा दिसतो.

महेश मांजरेकर व भरत जाधव यांनी रंगभूमीकडे वेगळ्या पद्धतीने पाहणाऱ्या तरुण लेखक-दिग्दर्शकासमवेत काम करणे आणि स्वत:सह प्रेक्षकांना रिफ्रेश ठेवणे यासाठी हे कौतुक. ‘अस्तित्व’ या नाटकापासून व ‘आता थांबायचं नाय’ सिनेमामुळे प्रेक्षकांनी भरत जाधव यांना अभिनेता, चरित्र-अभिनेता म्हणून स्वीकारलेले आहे. सतत विनोदी अभिनेता म्हणून चाकोरीबद्ध न होण्यासाठी हे जरूरीचे. रंगभूषा-वेशभूषाकार यांनी दोघांना आहे त्याच वयात खुलवले आहे. श्याम चव्हाण यांनी भावनिक-सांगीतिक मूड जपला. अजित परब यांनी क्षितिजच्या गीतातून ‘माणसे जातात,आठवणी नाही!’ हे चिरंतन सत्य तरलतेने सांगितले आहे.

भरत जाधव एन्टरटेनमेंट निर्मित

लेखक :

विराजस कुलकर्णी,

दिग्दर्शक :

सूरज पारसनीस,

गीत :

क्षितिज पटवर्धन,

संगीत :

अजित परब

प्रकाशयोजना :

श्याम चव्हाण,

वेशभूषा :

लक्ष्मण गोल्लार,

रंगभूषा :

सचिन जाधव,

प्रयोग व्यवस्था :

मनोज टाकणे, अमृता परब

कलाकार :

भरत जाधव,

महेश मांजरेकर, शिवानी रांगोळे