पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर सोमवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास अमृतांजन पुलाजवळील तीव्र उतार आणि वळणावर पुन्हा एकदा प्रोपलीन या ज्वलनशील गॅसची वाहतूक करणाऱ्या टँकरचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. सुदैवाने मार्गालगतच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गटारात जाऊन टँकर अडकला. यामुळे मोठा अनर्थ टळला.
खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याच्या प्रवेशद्वारावर प्रोपलीन या ज्वलनशील गॅसची वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात नुकताच तीन फेब्रुवारीला होऊन गेला. मात्र, त्यानंतर उद्भवलेली वाहतूक कोंडी आणि त्यामुळे झालेल्या समस्यांचे परिणाम, पडसाद अजूनही ताजे असताना ही घटना घडली. मात्र, अनर्थ टळल्याने नागरिकांना हायसे वाटले.
खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच अपघात स्थळापासून तीनशे मीटर अंतरावरील बोरघाट (दस्तुरी) महामार्गाचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील पाटील, नीलेश सरोदे, खोपोली पोलिस निरीक्षक सचिन हिरे, रसायनतज्ज्ञ धनंजय गीध यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पहाणी केली. पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवली. युद्धपातळीवर अपघातग्रस्त गॅस टँकर हटवण्याची मोहीम सुरू केली. अर्ध्या तासात टँकर क्रेनच्या साह्याने सुरक्षितपणे हटवला. या दरम्यान पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.






