क्षयरोग निर्मूलनात नाशिक महापालिका अव्वल

Contributed byशहर क्षयरोग अधिकारी|महाराष्ट्र टाइम्स

Nashik Municipal Corporation has achieved the top position in Maharashtra for its National Tuberculosis Elimination Program implementation. This recognition comes from the central government's health department. The corporation successfully treated 114 drug-resistant TB patients. Over three and a half lakh citizens were screened. The city needs more 'Nixhay Mitras' to support TB patients with nutritional needs.

क्षयरोग निर्मूलनात नाशिक महापालिका अव्वल
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या (एनटीईपी) प्रभावी अंमलबजावणीत नाशिक महापालिकेने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. या कामगिरीसाठी महापालिकेला राज्य शासनातर्फे सन्मानितही करण्यात आले. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून केल्या गेलेल्या मूल्यांकनात नाशिक महापालिकेला हे यश मिळाले आहे.

क्षयरोगमुक्त भारत हे लक्ष्य साध्य करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. संशयित रुग्णांच्या चाचणीचा दर, औषध-प्रतिरोधक, क्षयरोगाचे अचूक व्यवस्थापन आणि घरोघरी रुग्ण शोधमोहीम आणि इतर काही निर्देशकांच्या आधारे केलेल्या मूल्यांकनाच्या आधारे ही क्रमवारी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून निश्चित करण्यात आली. या मोहिमेचे कठोर निकषांच्या आधारे पालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा काळे यांनी वैद्यकीय विभागातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाच्या सहकार्याने तळागाळात हे अभियान राबवले. या मोहिमेतील विशेष बाब म्हणजे ११४ औषध-प्रतिरोधक रुग्णांवर यशस्वी उपचार करणे ही पालिकेसाठी एक मोठी तांत्रिक आणि वैद्यकीय कामगिरी ठरली आहे. एनटीईपी अंमलबजावणीत नाशिक महापालिकेच्या क्षेत्रात साडेतीन लाख नागरिकांची आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली.

‘निक्षय मित्रां’ची गरज

क्षयरोगमुक्तीच्या या लढ्यात लोकसहभाग तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. या रुग्णांना पोषक आहाराची गरज असते. या रुग्णांसाठी ‘फूड बास्केट’ देण्याचे शासनाचे आवाहन आहे. जे नागरिक क्षयरुग्णांना ‘फूड बास्केट’ देण्याची जबाबदारी उचलतात, त्यांना ‘ निक्षय मित्र ’ म्हणतात. नाशिक महापालिकेत २०२२ मध्ये ३,८९६, २०२३ मध्ये ३,५८५, २०२४ मध्ये ३,७६२ तर २०२५ मध्ये ३,२२४ क्षयरुग्ण आढळले. दुसरीकडे शहरात केवळ २०० ‘निक्षय मित्र’ आहेत. आणखी किमान दोन हजारांहून अधिक ‘निक्षय मित्रां’ची गरज आहे.