पुणे : काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना मित्रमंडळ चौक परिसरात सोमवारी सायंकाळी घडली. दामगुडे यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पवार आणि दामगुडे एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमानंतर त्यांच्यात वाद झाला. दामगुडे आणि त्यांच्या तीन ते चार सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप पवार यांनी केला. ‘तू भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विरोध का करतोस, हर्षवर्धन सपकाळ यांची बाजू का घेतोस’, असे प्रश्न विचारून दामगुडे यांनी मला धमकावले. तसेच पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पवार यांनी केला. दरम्यान, दामगुडे यांनी या आरोपांचे खंडन केले.





