अजितदादा कार्यरूपाने सदैव जिवंत राहतील

महाराष्ट्र टाइम्स

Leaders across Maharashtra gathered to mourn the passing of Ajit Pawar. Governor Acharya Devvrat highlighted his lifelong dedication to social service. Chief Minister Devendra Fadnavis acknowledged Pawar's significant role in Maharashtra's development and his administrative acumen. NCP leaders and other dignitaries shared their memories, emphasizing the void left by his absence.

अजितदादा कार्यरूपाने सदैव जिवंत राहतील
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

‘अजितदादा कर्तव्यनिष्ठेने आयुष्य जगले, त्यांचे आयुष्य हे समाजकारणात असलेल्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. माझा त्यांचा प्रदीर्घ परिचय नव्हता परंतु, दोन ते तीन भेटींतच त्यांचा सहजपणा मला भावला. शरीररूपाने ते आपल्यात नसले तरी कार्यरूपाने ते सदैव जिवंत राहतील’, या शब्दांत महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. ‘आपल्या पश्चात आपली आठवण कशी ठेवली जाते त्यावरून आपल्या जीवनाचा दर्जा अधोरेखित होतो, अजितदादांविषयी लोकांच्या मनात असलेले प्रेम पाहून त्यांच्या निरंतर कार्याची प्रचिती आपल्याला येते’, असेही ते म्हणाले.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शोकसभेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वरळी येथील एनएससीआय डोम येथे करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, त्यांचे पुत्र पार्थ पवार, जय पवार यावेळी उपस्थित होते. ‘असा दिवस आपल्या आयुष्यात येईल अशी कधीही कल्पना केली नव्हती. अजितदादा आणि माझी राजकीय कारकीर्द एकाच वेळी सुरू झाली’, असे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले.

‘एखादे राज्य घडविण्यास केवळ एकच व्यक्ती जबाबदार नसते. वेगवेगळ्या कालखंडात वेगळे नेतृत्व आपले योगदान देतात. महाराष्ट्राच्या जडणघडणीच्या इतिहासात ज्या नेत्यांचा उल्लेख केला जाईल त्यात अजितदादांचे एक प्रमुख नाव असेल’, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. ‘अजितदादांनी या राज्यात लोकनेता अशी प्रतिमा तयार केली. महाराष्ट्राची नस माहीत असणारा नेता म्हणजे अजितदादा, एक उत्तम प्रशासक म्हणून जे गुण हवेत ते त्यांच्यात होते. प्रशासनातील आर्थिक शिस्त हा अजितदादांचा आवडता विषय होता’, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना अजितदादांबद्दल बोलताना भावना अनावर झाल्या.

‘२८ जानेवारी हा काळा दिवस राज्याने पाहिला, अजितदादांच्या मृत्यूमुळे राज्यात प्रत्येकाला आपल्या घरातील कोणीतरी गेल्याचे वाटत आहे’, या शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते, राष्ट्रवादी शप पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, यांच्यासह माजी सरन्यायाधीश भूषण गवई, उद्योगपती मुकेश अंबानी, गौतम अदानी, अशोक हिंदुजा, निरंजन हिरानंदानी, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे, दिग्दर्शक मधूर भांडारकर या शोकसभेला उपस्थित होते.