राहुल यांची ‘महंमद दीपक’शी भेट

महाराष्ट्र टाइम्स

Congress leader Rahul Gandhi met Deepak Kumar, a gym owner from Kotdwar. Deepak Kumar had intervened when Bajrang Dal activists were harassing a Muslim shopkeeper. Gandhi expressed support for Deepak Kumar's actions. He stated that every person is equal and this is Indianness. Gandhi also mentioned he would join Deepak Kumar's gym. The meeting took place at Sonia Gandhi's residence.

राहुल यांची ‘महंमद दीपक’शी भेट

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी उत्तराखंडच्या कोटद्वार येथील ‘ महंमद दीपक ’ या जिम मालकाची भेट घेतली. एका मुस्लिम दुकानदाराला त्रास देणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना रोखल्यामुळे ‘महंमद दीपक’ म्हणून चर्चेत आलेल्या दीपककुमार (४२) याला पाठिंबा दर्शवून राहुल गांधी म्हणाले, की ते कोटद्वार येथे जाऊन त्याच्या जिमचे सदस्यत्व घेतील.

काँग्रेस नेते वैभव वालिया, जिम मालक दीपककुमार आणि त्याचा मित्र विजय रावत यांच्यासह अनेक जण या वेळी उपस्थित होते. ही भेट काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांच्या १०, जनपथ येथील निवासस्थानी झाली. दीपक यांनी सोनिया गांधी यांचीही भेट घेतली.

‘प्रत्येक मनुष्य समान आहे. हीच भारतीयता आहे, हीच ‘मोहब्बत की दुकान’ आहे. उत्तराखंडमधील बंधू महंमद दीपक यांच्याशी भेट झाली. एकतेची आणि धैर्याची हीच ज्योत प्रत्येक भारतीय तरुणामध्ये प्रज्वलित व्हावी,’ असे राहुल गांधी यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

‘राहुलजींनी मला आमंत्रित केले. त्यांनी माझी सोनियाजींशी ओळख करून दिली आणि माझ्या पत्नीशीही फोनवर बोलले. त्यांनी मला सांगितले, की तुम्ही चांगले काम केले आहे आणि मी कोटद्वारला येऊन तुमच्या जिमचे सदस्यत्व घेईन,’ असे दीपककुमार यांनी या भेटीनंतर सांगितले.