लोणावळा : पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर अमृतांजन पुलाजवळील तीव्र उतार आणि वळणावर सोमवारी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा प्रोपलीन या ज्वलनशील गॅसची वाहतूक करणाऱ्या टँकरचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. मात्र मार्गालगतच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गटारात टँकर अडकला आणि मोठा अनर्थ टळला.
खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याच्या प्रवेशद्वारावर प्रोपलीन या ज्वलनशील गॅसची वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाल्याची घटना ३ फेब्रुवारीला घडली होती. त्यानंतर पुन्हा अशीच घटना घडली. मात्र, अनर्थ टळल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पोलिसांनी पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवली. अर्ध्या तासात टँकर सुरक्षित हटवला. मात्र तोपर्यंत महामार्गावर कोंडी झाली होती.






