खडूची धूळ नियंत्रित करणारे ‘डस्टर’

महाराष्ट्र टाइम्स

लिवे शाळेतील सातवीचा विद्यार्थी स्वरूप साळवी याने खडूची धूळ नियंत्रित करणारा स्मार्ट डस्टर बनवला आहे. हा डस्टर मोबाइल ॲपद्वारे चालतो. फळा पुसल्यावर खडूची धूळ यात खेचली जाते. यामुळे वर्गातील धुळीचा त्रास कमी झाला आहे. स्वरूपच्या या शोधाला वैज्ञानिक प्रदर्शनांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा डस्टर बॅटरी किंवा विजेवर चालतो.

खडूची धूळ नियंत्रित करणारे ‘डस्टर’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

येथील लिवे शाळेत सातवीत शिकणाऱ्या स्वरूप रूपेश साळवी या विद्यार्थ्याने शिक्षक आणि पालकांच्या मदतीने वैज्ञानिक संज्ञा वापरून स्वयंचलित स्मार्ट डस्टर तयार केला आहे. विशेष म्हणजे केवळ प्रयोगापुरते मर्यादित न ठेवता त्याने हे डस्टर उपयोगातही आणले आहे.

शाळेत साध्या डस्टरने फळा पुसला की खडूची धूळ उडते. शिक्षक, विद्यार्थ्यांना त्या धुळीचा त्रास होतो. स्वरूपच्या हे लक्षात आले. उडणाऱ्या धुळीचा प्रश्न सोडविण्यासाठी हवा आत खेचणाऱ्या छोट्या पंख्याचा समावेश असणारे एक संयत्र त्याने तयार केले. मोबाइल ॲपद्वारे संचलित अशा या स्मार्ट डस्टरद्वारे फळा पुसला जाऊन खडूची धूळ त्या यंत्रात आत खेचली जाते. मोबाइलद्वारे हा स्मार्ट डस्टर वापरता येतो.

या स्मार्ट डस्टरने वर्गात खडूमुळे होणाऱ्या धुळीचा प्रश्न मिटला आहे. स्वरूपने तयार केलेले हे डस्टर फळ्याच्या एका बाजूला बसवता येते. ते बॅटरी किंवा विजेवर चालवता येते. मुख्याध्यापिका अर्चना जाधव, शिक्षक विनीता सोल्स, निलेश गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वरूपने बनविलेल्या स्मार्ट डस्टरला वैज्ञानिक प्रदर्शनांमधून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विज्ञानामध्ये रूची असणाऱ्या स्वरूपला संगीताचीही आवड आहे.