डॉ. वाजपेयीची डिग्रीही बोगस

महाराष्ट्र टाइम्स

A doctor, Dr. Nitesh Vajpayee, is at the center of a baby trafficking scandal in Bhandara district. Investigations reveal his medical degree may be fake. Police are actively probing this. The case came to light after a child welfare committee's alert. Dr. Vajpayee, who runs a hospital in Gondia, has been arrested along with others.

baby selling racket exposed shocking revelation that dr nitesh vajpeyis medical degree is also fake

भंडारा जिल्ह्यात गाजत असलेल्या बाळविक्री प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. नितेश वाजपेयी याची डिग्रीही बोगस असल्याची माहिती आहे. पोलिस त्या दिशेने तपास करीत आहेत. डॉक्टरच्या रुग्णालयाच्या नोंदणीबाबत गोंदिया येथील जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी सोमवारी दिली.

उपचाराच्या नावाखाली बाळाची विक्री करण्याचा प्रकार बालकल्याण समितीच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला होता. याप्रकरणी वरठी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाला वेग आला. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गोंदिया येथील न्यू बालाजी हॉस्पिटलचा संचालक डॉ. नितेश वाजपेयी असल्याचे उघड झाल्याने त्याच्यासह अन्य पाच जणांवर गुन्हे दाखल झाले होते. यापैकी डॉक्टरसह पाच जणांना अटक करण्यात आली होती. तर सोमवारी मालती वाघमारे रा. पांढराबोडी या महिलेला अटक करण्यात आली. डॉ. वाजपेयी याची तीन दिवसांची पोलिस कोठडी संपली असून न्यायालयात पुन्हा ११ दिवसांची पोलिस कोठडी मागणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

पहिले बाळविक्री प्रकरण उजेडात आल्यानंतर डिसेंबर महिन्यातही एका बाळाची विक्री केल्याची बाब समोर आली. २१ फेब्रुवारी रोजी रात्री महिला बालकल्याण समितीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिसांनी डिसेंबर महिन्यात विक्री झालेले हे बाळ ताब्यात घेतले. या बाळाची विक्री ४ लाख ७० हजारांत झाली होती.

यावेळी अपर पोलिस अधीक्षक निलेश मोरे आणि तपास अधिकारी शिवम विसापुरे उपस्थित होते.

मध्य प्रदेश, छत्तीसगड ‘कनेक्शन’

आर्थिक दुर्बल, गरजू पालकांना या बाळांची खरेदीविक्री केली जात होती. त्यातून डॉक्टर त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत होता. बाळविक्री केल्याची दोन प्रकरणे उघडकीस आल्यानंतर आणखी अनेक प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता आहे. डॉ. वाजपेयी याचे रुग्णालय गोंदियाला आहे. हा भाग छत्तीसगड आणि मध्य प्रदेशला लागून आहे. त्यामुळे या राज्यातील रुग्ण त्याच्या रुग्णालयात येत होते. त्याचाही तपास सुरू आहे, अशी माहिती हसन यांनी दिली.